पुणे बार असोसिएशनचे सचिव अॅड. घनश्याम दराडे यांची मुख्यमंत्र्याकडे ई-मेलद्वारे मागणी
पुणे(प्रतिनिधी) – करोना संसर्गामुळे वकिलावर आर्थिक संकट ओढावले आहे. कित्येकांना गुजराण करणे अवघड बनले आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी वकिलांना मदतनिधी मंजुर करावी, अशी मागणी पुणे बार असोसिएशनचे सचिव ऍड. घनश्याम दराडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन ठाकरे यांना ई-मेल करण्यात आले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्याहून अधिक काळापासून न्यायालय बंद आहे. सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत केवळ महत्त्वाच्या प्रकरणाची सुनावणी होते. महत्त्वाच्या खटल्याच्या सुनावणीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सची सुविधा आहे. मात्र, अर्जंट सुनावणीच्या वेळी वाय-फाय जोड व्यवस्था आणि इतर कारणांमुळे अडथळे येत आहेत. इतर वेळी प्रत्यक्ष हजर राहून काम करणाऱ्या वकिलांसमोर आर्थिक समस्या निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत आवाहन करून वकिलांकडून जमविलेल्या निधीतून गरीब, गरजू वकिलांना अन्नधान्य आणि किराण्याच्या कीटचे वाटप करण्यात आलेले आहे. सरकारकडून चांगले काम करण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे सरकारचा महसुल कमी झालेला आहे. तरीही अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी वकिलांना काही प्रमाणात का होईना, मदत करावी, अशी आमची अपेक्षा आहे.
पुणे बार असोसिएशननेही याबाबत ठराव केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या माध्यमातून वकिलांना मदत द्यावी, असे निवेदनात नमुद करण्यात आले असल्याचे ऍड. घनश्याम दराडे यांनी सांगितले.