पुणे – 6 ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यास मंजुरी

पुणे – जिल्ह्यात पाणी टंचाईपाठोपाठ चारा टंचाईची भीषणता तीव्र झाली आहे. बाधित पशुधनांना चारा उपलब्ध व्हावा. त्यासाठी जिल्ह्यात राज्य शासनाकडून चारा छावण्या सुरू करण्यात येत आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात सहा ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यास प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये शिरूर तालुक्‍यात दोन छावण्या सुरू झाल्या असून बारामतीमध्ये एक छावणी सुरू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. जनावरांची जुळवाजुळव, चारा पुरवठादार या सर्वांची छावणी चालकांकडून कामे सुरू असल्याची माहिती तहसीलदार विजय पाटील यांनी दिली.

शिरूरमधील केंदूर आणि कान्हूर मेसाईच्या छावण्या सुरू झाल्या आहेत. तर बारामतीमधील बारामती पळशीची छावणी सुरू झाली आहे. पळशीची छावणी दोन दिवसांपूर्वी सुरू झाली आहे. 1 हजार 100 पेक्षा अधिक जनावरांच्या नोंदी शेतकऱ्यांनी केल्या आहेत; परंतुु सध्या छावणीत 350 जनावरे दाखल झाली आहेत. उर्वरित जनावरे पुुढील दोन-तीन दिवसांत छावणीत दाखल होतील, असे तहसीलदारांनी सांगितले.

जिल्ह्यात चाऱ्याची तीव्र टंचाई भासत असल्याने विविध ठिकाणांहून छावणी सुरू करण्यासाठी प्रस्ताव येत आहेत. तर शेतकऱ्यांकडून देखील छावणी सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. चारा छावणीमध्ये दाखल होण्यापूर्वी चाऱ्याची व्यवस्था चालकांना करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यामुळे पेंड, मुरघास, इतर चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी पुरवठादार शोधल्यानंतरच छावणी सुरू करण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला जनावरे कमी असलेल्या खासगी छावणी चालकांना अनुदान मिळणार का? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

छावणी सुरू करण्यासाठी धावपळ
तीनशे जनावरांसाठी छावणी चालकांना छावणी सुरू करता येत नसल्याने एकाचवेळी दोन-तीन टप्प्यांवर तयारी करावी लागत आहे. त्यामुळे छावणी सुरू करण्यास विलंब होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून छावणी सुरू करण्यासाठी मुदत दिली आहे. त्या मुदतीच्या आत छावणी सुरू करण्याची धावपळ सुरू आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×