मुंबई – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी 2020-21च्या अर्थसंकल्पात क्रीडा विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा केली होती. हे विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात सादर करण्यात येईल. त्यांच्या घोषणेनुसार आता आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रच्या प्रारूप विधेयकास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
या क्रीडा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी आवश्यक अधिनियम प्रारूप तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीने सादर केलेल्या प्रारूप विधेयकास विधी व न्याय विभागाच्या मान्यतेनंतर ते मंत्रिमंडळासमोर सादर केले होते.
पुण्याच्या बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात हे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यामध्ये शारीरिक शिक्षण, क्रीडा विज्ञान, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा माध्यम व संवाद, क्रीडा प्रशिक्षण यातून रोजगारही उपलब्ध होणार आहेत. मणिपूर व गुजरात येथे क्रीडा विद्यापीठ कार्यरत झाली असून बालेवाडी येथे क्रीडा विद्यापीठ कार्यान्वित झाल्यानंतर स्वतंत्र इमारत बांधण्याचाही सरकारचा प्रस्ताव आहे.
क्रीडा विद्यापीठ उभारून आवश्यकतेनुसार पाच वर्षांकरिता शिक्षक, कर्मचारी आदी मिळून 213 पदे भरण्याचे प्रस्तावित आहे.