पालिकेला सुमारे 47 लाख 46 हजार रुपये खर्च येणार
पुणे – करोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना हॉटेलमध्ये क्वारंटाइन ठेवण्यात येते. त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद महापालिका स्थायी समितीने केली आहे. यासाठी सुमारे 47 लाख 46 हजार रुपये खर्च येणार आहे. समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी याबाबत माहिती दिली.
करोनाबाधित रुग्णांचा उपचार करणारे डॉक्टर तसेच स्वॅब गोळा करणाऱ्या सेंटरमध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, परिचारिका आणि अन्य कर्मचारी यांची राहण्याची सोय शहरातील चार हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबामध्ये संक्रमण होऊ नये यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे.
या हॉटेल्समध्ये राहण्याबरोबरच एकवेळचे जेवण, चहा, नाष्टा याची व्यवस्था करण्यात आली आहे. या हॉटेलचे रुम वापरण्यासाठी महिन्याचा खर्च 47 लाख 46 हजार रुपये अपेक्षित आहे. ज्या दिवशी हॉटेलचा वापर केला जाईल, त्यानुसार हा खर्च केला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.