पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्य शासनाची लोकप्रिय घोषणा ठरलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातून एकूण 9 लाख 73 हजार अर्ज केले आहेत. यातील 9 लाख 34 अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. तर 39 हजार अर्जांची छाननी सुरू आहे.
ज्या अर्जांमध्ये त्रुटी आहेत, त्यांची पूर्तता क़रण्याच्या सूचना अर्जदारांना दिल्या आहेत. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंंतर या अर्जांना मंजुरी दिली जाणार आहे. याबाबतची माहिती महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली.
लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना प्रतिमहिना दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. जुलै व आॉगस्ट या दोन महिन्यांचे एकत्रित लाभ दि. १७ आॅगस्टपासून दिले जाणार आहेत. यात पहिला हप्ता दि. 19 आॅगस्टपर्यंत महिलांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.
या योजनेसाठी नारी शक्ती दूत अॅपवरूनही अर्ज भरण्याची सुविधा आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांने अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र केंद्र स्थापन केले आहे. जिल्ह्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनीदेखील यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. अंगणवाडी स्तरावरदेखील अर्ज भरून घेण्यात येत आहेत.