सातारा -जिल्ह्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य शासनाने साताऱ्यातील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात करोना चाचणी प्रयोगशाळा (आरटी पीसीआर लॅब) उभारण्यास मान्यता दिली आहे. राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
राज्य शासनाकडून तातडीची बाब म्हणून साताऱ्यात करोना चाचणी प्रयोगशाळा उभारण्यास मंजुरी देऊन यासाठी आवश्यक असलेल्या 75 लाख 46 हजार 186 रुपये इतका निधी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी किंवा जिल्हा नियोजन समितीमधून खर्च करण्यास मंजुरी दिली आहे.
या प्रयोगशाळेसाठी लागणारी यंत्रसामुग्री ई टेंडरऐवजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, कोल्हापूर यांच्याकडील 18 एप्रिलच्या पुरवठा आदेशानुसार करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच लागणारे आवश्यक ते तांत्रिक मनुष्यबळ व त्यावरील खर्च राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गंत उपलब्ध निधीतून करण्यासही मान्यता दिली आहे.
सातारा जिल्ह्यात आरटी पीसीआर लॅब नसल्याने करोनाच्या चाचणीसाठी रुग्णांच्या स्त्रावाचे नमुने पुणे येथे पाठवावे लागत आहेत. जिल्ह्यात येणारी बहुतांश कुटुंबे कंटेनमेंट, हॉटस्पॉट व रेड झोनमधील असल्याने या सर्व नागरिकांचे लक्षणे दिसत असल्यास करोना तपासणी करणे अनिवार्य ठरत आहे.
तपासणीसाठी व अहवाल प्राप्तीसाठी लागणारा कालावधी बघता प्रशासकीय यंत्रणेवर ताण येत आहे व मोठ्या प्रमाणावर खर्चही होत आहे. ही परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्हा रुग्णालयात आरटी पीसीआर लॅबसाठी प्रस्ताव पाठविला होता.