बीजिंग – अमेरिकेने नियोजनाप्रमाणे जर तैवानला शस्त्रविक्री केली तर चीनकडून योग्य आणि आवश्यक तसेच प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा चीनने दिला आहे. अमेरिकेने तैवानला 60 कोटी डॉलरच्या लष्करी ड्रोनची विक्री केली तर तो चीनच्या अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप ठरेल. तसेच चीनचे सार्वभौमत्व आणि सुरक्षिततेच्या विषयाला गंभीर धोका उत्पन्न केल्यासारखे होईल आणि त्याला चीनकडून योग्य प्रत्युत्तर दिले जाईल, याचा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वॅंग वेनबीन यांनी पुनरुच्चार केला आहे.
अमेरिका आणि चीनमधील संबंधांना भविष्यकाळात धोका टाळण्यासाठी आणि तैवानच्या खाडीपरैसरातील शांतता, सौहार्द कायम राखण्यासाठी अमेरिकेने तैवानबरोबरच्या सर्व शस्त्रविक्रीच्या व्यवहाराला रद्द करावे, असे वेनबीन यांनी दैनंदिन वार्तालापादरम्यान सांगितले.
तैवानला लष्करी ड्रोन आणि संबंधित उपकरणांची विक्री करण्यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी मंजूरी दिली. तैवानला आपले लष्करी सामर्थ्य अद्ययावत करायचे आहे. तसेच हा विषय अमेरिकेच्या राष्ट्रीय, आर्थिक आणि सुरक्षिततेच्या हेतूंशी संबंधित आहे, असेही अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. आठवड्याभरापूर्वीच अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने तैवानला 2.37 अब्ज डॉलर किंमतीच्या हार्पून क्षेपणास्त्रांची विक्री करण्यासदेखील मंजूरी दिली आहे. त्यावरून चीनने अमेरिकेच्या संरक्षण कंत्राटदारांविरोधात निर्बंधही लादले आहेत.