साथीचे आजार रोखण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात

कोपरगाव -आठ दिवसांपासून करोना आजाराशी झुंजणाऱ्या आ. आशुतोष काळे यांची प्रकृती सुधारत आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतांना देखील कार्यकर्ते व जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मतदारसंघाची माहिती ते जाणून घेत होते.

मतदार संघातील काही गावात डेंग्यू सदृश्‍य बाधित रुग्ण आढळल्याची माहिती समजली. त्यावेळी आ. काळे यांनी तातडीने तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्याधिकारी आदी जबाबदार अधिकाऱ्यांसमवेत ऑनलाईन बैठक घेवून साथीचे आजार रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.

तालुक्‍यातील काही गावांमध्ये मागील काही दिवसांत डेंग्यू सदृश्‍य बाधित रुग्ण आढळून आले. याची माहिती करोनावर उपचार घेत असलेल्या आ. काळे यांना समजली. स्वत: जरी जीवघेण्या आजाराशी लढत असलो तरी मतदार संघातील नागरिकांचे आरोग्य देखील महत्वाचे आहे. या भावनेतून त्यांनी तहसीलदार विजय बोराडे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका आरोग्याधिकारी डॉ. विकास घोलप, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, आरोग्याधिकारी डॉ. श्रीमती गायत्री कांडेकर यांच्या समवेत ऑनलाईन बैठक घेतली.

आ. काळे म्हणाले, कोपरगाव तालुक्‍यात डेंग्यू सदृश्‍य बाधित रुग्ण आढळून येत असून आरोग्य विभागाने यापुढे सतर्क राहावे. नागरिकांमध्ये जनजागृती करून उद्‌भवणाऱ्या आजारांपासून कसा बचाव करता येईल, यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत सखोल मार्गदर्शन करावे. साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होवून डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया असे अनेक आजार फैलावू शकतात.

त्यासाठी या पाण्याचा लवकरात लवकर निचरा कसा होईल, यासाठी उपाययोजना कराव्या,जंतुनाशक फवारण्या कराव्या अशा सूचना दिल्या. नागरिकांनी देखील प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. करोनाचे रुग्ण जरी कमी जास्त प्रमाणात सापडत असले तरी काळजी घेणे गरजेचे आहे.

करोना संपलेला नाही, वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप असे आजार डोके वर काढू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्‍टरांचा सल्ला घेवून योग्य त्या तपासण्या करून घ्या,आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, आरोग्याच्या बाबतीत सजग राहून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या असे आवाहन आ. काळे यांनी केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.