बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणी यांच्या “शेरशाह’ चित्रपटाची चाहते खूप उत्सुकतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राने आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांना प्रभावित केले आहे.
अक्षयकुमारपासून ते वरुण धवनपर्यंत अनेक कलाकारांनी चित्रपटाच्या ट्रेलरला पसंती दर्शविली आहे. अक्षयकुमारने एक ट्विट केले की, एक रियल हिरो हा एका खऱ्या हिरोला काय श्रद्धांजली देऊ शकतो. आपल्या बलिदानानेच आमचे जीवन प्रेरित आहे, असे त्याने म्हटले आहे.
वरुण धवन, आलिया भट्ट, करिना कपूर, जान्हवी कपूर यांच्याशिवाय अनन्या पांडे, सारा अली खान आणि विक्की कौशलनेही त्याची स्तुती केली. दरम्यान, “शेरशाह’मध्ये परमवीर चक्राने सम्मानित करण्यात आलेल्या विक्रम बत्रा यांची कथा दाखविण्यात आली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णुवर्धन यांनी केले आहे. यात सिद्धार्थ मल्होत्रासह कियारा आडवाणीने मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 12 ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.