WHO नंतर वॉशिंग्टन पोस्टकडून ‘धारावी पॅटर्न’चं कौतुक; म्हणाले…

मुंबई – भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा सध्या जागतिक स्तरावर बोलबाला आहे. अत्यंत दाट लोकसंख्या असलेल्या धारावीत कोरोनाचा फैलाव वेगाने होऊ लागल्याने परिस्थिती चिंताजनक बनली होती. मात्र अशा कठीण परिस्थितीत मुंबई महापालिकेने कौतुकास्पद कामगिरी करत करोनवार नियंत्रण मिळवलं आहे. 

मुंबई महापालिकेच्या चेस द व्हायरस मोहिमेला धारावीमध्ये मोठं यश मिळालं असून धारावी पॅटर्नचं सर्वांकडून कौतुक केलं जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून धारावी मॉडेलची स्तुती करण्यात आल्यानंतर आता वॉशिंग्टन पोस्टनेही याबाबतची दखल घेतली आहे.

जागतिक ख्यातीचे वृतपत्र असलेल्या वॉशिंग्टन पोस्टमध्ये, मुंबई महापालिकेने धारावीमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या कामगिरीबद्दल प्रशंसा करण्यात आली आहे. याआधी त्यांनी मुंबईसहित इतर महत्त्वाच्या शहरांमधील करोनाची माहिती देण्यासाठी दाखवलेल्या पारदर्शकतेबद्दल कौतुक केलं होतं.

३१ जुलै रोजी वॉशिंग्टन पोस्टमध्ये ‘How a packed slum in Mumbai beat back the coronavirus, as India’s cases continue to soar’ हा लेख प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये  धारावी पॅटर्नची स्तुती करण्यात आली आहे. धारावीमधील करोनाविरोधातील लढा घनदाट वस्ती असणाऱ्या अनेक शेजारी तसंच खास करुन विकसित देशांसाठी महत्त्वाचा धडा असल्याचं लेखात म्हटलं आहे. “डोक्यावर करोना संकट असताना धारावीने केलेले उपाय, सर्वांचा सहभाग आणि चिकाटी ही दखलपात्र आहे,” असंही या लेखामध्ये नमूद करण्यात आलंय.

मुंबईत ११ मार्च रोजी पहिला रुग्ण सापडल्याच्या तीन आठवड्यानंतर म्हणजेच १ एप्रिल रोजी धारावीत पहिला कोरोना रुग्ण आढळला. यानंतर महापालिकेने चेस द व्हायरस योजना युद्धपातळीवर  राबविल्याने येथील परिस्थिती आटोक्यात आणता आली.

धारावीत सध्या फक्त ७२ सक्रिय (ऍक्टिव्ह) रुग्ण असून २२३५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसर धारावीमधील ८५ टक्के कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.