पिंपरी -पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघनिहाय पक्षबांधणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना सज्ज झाली आहे. युवासेना, महिला आघाडी व शिवसेनेच्या विविध पदांवर इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती काही दिवसांपूर्वी पार पडल्या. त्यानंतर भोसरी विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र काही लोकांचा पक्ष प्रवेश सुरू असल्याने पिंपरी-चिंचवडच्या नियुक्ती रखडलेल्या आहेत. येत्या दहा दिवसांत त्या देखील जाहीर करण्यात येणार आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवीन पदाधिकारी निवडीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून युवासेनेच्या विविध पदांवर काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ऑक्टोबर महिन्यांपासून मुलाखतींचे सत्र सुरू आहे. यामध्ये भोसरी, पिंपरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघनिहाय इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मुलाखती पार पडल्या. 100 पेक्षा अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
मुलाखती पार पडल्यानंतर नियुक्ती जाहीर करण्याची प्रक्रिया रखडली होती. नुकतीच भोसरी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली होती. मात्र पिंपरी आणि चिंचवड विधानसभेच्या नियुक्ती अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. अनेक जण पक्षप्रवेश करत असून ते पदांवर काम करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांच्या मुलाखती घेऊन येत्या दहा दिवसांत नियुक्ती करण्यात येणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. त्यामध्ये युवासेना, महिला आघाडीचा देखील समावेश असून नवीन तरुणांना संधी मिळणार आहे.
सध्या नवीन पक्षप्रवेश सुरू आहेत. त्यामुळे पिंपरी, चिंचवडच्या नियुक्ती केलेल्या नाहीत. येत्या दहा दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण करून पदाधिकारी जाहीर करू. भोसरी विधानसभेच्या नियुक्ती देण्यात आल्या आहेत.
– ऍड. सचिन भोसले, शहरप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे