नवी दिल्ली- ज्येष्ठ अर्थतज्ञ व्ही अनंत नागेश्वरन यांची अर्थ मंत्रालयाचे नवीन मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. नागेश्वरन यांनी शिक्षण क्षेत्रात बरेच काम केले आहे.
त्याच बरोबर क्रेडिट सुईस आणि जुलियस बियर या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्येही अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. के व्ही सुब्रमण्यन या अगोदर अर्थ मंत्रालयाचे मुख्य सल्लागार होते. त्यांनी आपला तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये पद सोडले होते आणि ते पुन्हा शिक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी गेले होते.नागेश्वरन यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
लवकरच केंद्र सरकारचा नवीन आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेला लॉकडाउनच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी अर्थ मंत्रालय प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये या विषयावर नागेश्वरन यांना काम करावे लागणार आहे. भारत सरकारने निर्गुंतवणुकीचे धोरण स्वीकारले आहे.
या क्षेत्रातही नागेश्वरन यांना दिशा देण्याचे काम करावे लागणार असल्याचे समजले जाते. वाढलेली महागाई आणि सरकारची वाढलेली तूट कमी करण्यासाठी अर्थ मंत्रालयाला आगामी काळात मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागणार आहेत.