शिरूर : शिरूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात पुरवठा निरीक्षण आधिकारी तथा नायब तहसीलदार पुरवठा विभाग या पदी सदाशिव व्होणमाने यांची नियुक्ती झाली आहे. यापुर्वी सदाशिव व्होणमाने यांनी पुरवठा निरीक्षक म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, संग्रामपूर या तालुक्यामध्ये अतिशय प्रभावीपणे काम केलेले आहे.
शिरूर तालुक्यात 20 हजार 568 शिधापत्रिकाधारकांना धान्याचा लाभ मिळत नसून त्या शिधापत्रिकेतील तब्बल 90 हजार 329 लाभार्थी धान्यापासून वंचित आहे. शिरूर तालुक्यात धान्य न मिळणाऱ्यांची मोठी संख्या असून पुणे जिल्हयातील हवेली तालुक्यापाठोपाठ शिरूर तालुक्यातील ही संख्या मोठी आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे वाढीव इष्टांक मिळवण्यासाठी पाठपुरावा करणार असून हा इस्टांक आल्यास प्राधान्याने विधवा, परितक्त्या, अपंग या लाभार्थ्यांना तातडीने लाभ देण्यात येईल. तसेच नागरीकांची प्रलंबित असलेली कामे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर मार्गी लावल्याचा प्रयत्न करणार असल्याचे पुरवठा नायब तहसीलदार सदाशिव व्होणमाने यांनी सांगितले आहे.