जम्मू काश्‍मीरच्या नायब राज्यपालपदी मनोज सिन्हा यांची नियुक्ती

नवी दिल्ली: जम्मू काश्‍मीरच्या नायब राज्यपालपदी भाजपा नेते आणि माजी मंत्री मनोज सिन्हा यांची निवड करण्यात आली आहे. जीसी मूर्मू यांचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारला आहे. त्यामुळे आता त्यांच्या जागी मनोज सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बुधवारी संध्याकाळी गिरीष चंद्र मूर्मू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. 5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्‍मीरमधून कलम 370 हटवण्याला एक वर्ष पूर्ण झाले. मूर्मू यांनी 31 ऑक्‍टोबर 2019 रोजी जम्मू काश्‍मीरच्या नायब राज्यपालपदाची शपथ घेतली होती. त्यांच्या कार्यकाळात काश्‍मीर शांतता, स्थिरता आणि विकासाच्या मार्गावर पुढे गेल्याचे म्हटले जात आहे. तसेच राज्यात दहशतवाद आणि दगडफेकीसारख्या घटनांमध्येही घट झाली आहे.

मनोज सिन्हा हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. मनोज सिन्हा हे भाजपाचा मोठा चेहराही मानले जातात. 2019 मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळेच पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात स्थान देता आले नव्हते. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांच्याकडे रेल्वे राज्यमंत्रीपदाचा कारभार सोपवण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.