पुणे (प्रतिनिधी) – राज्यातील शिक्षण क्षेत्रातील प्रश्न, बेरोजगार तरुणांचे प्रश्न, स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध प्रश्नांवर कार्यरत असणारा युवा चेहरा म्हणून ओळख असलेल्या कल्पेश यादव यांची युवासेनेच्या सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या उपसचिव, सहसचिवपदी नियुक्त्या केल्या आहेत. या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यानंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून नियुक्त्या कायम करण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.
कल्पेश यादव यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन युवासेनेत प्रवेश केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला होता. त्यानंतर नुकतीच यादव यांची अधिकृत रित्या युवासेनेच्या सहसचिव पदी नियुक्त करण्यात आली आहे.
विद्यार्थी हिताच्या चळवळीत गेली अनेक वर्ष सक्रिय रित्या काम करत आहे. याबरोबरच समाजकार्य करत सामान्य माणसाच्या प्रश्नाला वेळोवेळी वाचा फोडण्याचे काम करत आहे. पक्षाने युवासेना सहसचिव पदाची जबाबदारी सोपवली असून सर्वांच्या सहकार्याने तसेच अमूल्य मार्गदर्शनाने आता राज्यातील प्रत्येक तरुणाच्या मनावर युवासेनेची छाप उमटविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले आहे.