पुणे – पुणे, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागात करोना संसर्ग रोखण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यानुसार अशा चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य सचिव डॉ. माने यांच्याकडे करोना तपासणी करणाऱ्या शासकीय तसेच मान्यताप्राप्त लॅबवर नियंत्रण ठेवणे. चाचण्या वाढवण्यासाठी उपाययोजना, करोना चाचणी अहवाल लवकर मिळण्यासाठी उपाययोजनांची जबाबदारी आहे.
क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे करोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण निदर्शनास येतात, अशा व्यक्तींच्या संपर्कात येणाऱ्या सर्व व्यक्तींना शोधणे आणि उपाययोजना करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पवनीत कौर यांच्याकडे करोना बाधित सर्व रुग्णांना वेळेवर बेड मिळण्यासाठी खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेडबाबतची माहिती संनियंत्रण आणि नियोजन करण्याची जबाबदारी आहे.
कृषि आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडे करोना रोखण्यासाठी प्रशासनातील सर्व अधिकारी काम करत आहेत, परंतु त्यामध्ये लोकसहभाग असणे आवश्यक आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेऊन सुनियोजित पद्धतीने लोकसहभाग वाढविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.