पुणे – अपंग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्या बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी झालेल्या नियुक्तीला खो घालण्यात आला आहे. महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल रेखावार यांची बीडच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून देशभ्रतार यांच्याकडील कार्यभार तसाच ठेवण्यात आला आहे.
भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी सेवा बजावली आहे. त्यानंतर त्यांची पुण्यातील अपंग कल्याण आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.
त्यानंतर महिनाभरापूर्वी राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यावेळी देशभ्रतार यांची बीडच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली होती. त्यावेळी बीडमधील राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने देशभ्रतार यांच्या नियुक्तीला विरोध केला होता. त्यानंतर सूत्रे हलल्याने, देशभ्रतार या पदावर रुजू होऊ शकल्या नाहीत. दरम्यानच्या काळात सोमवारी (दि.10) सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने राहुल रेखावार याची बीड जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्याचा अध्यादेश काढण्यात आला आहे. त्यामुळे या आदेशाची चर्चा होत आहे.