बंगळूर – कर्नाटक राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचं वाढतं वय पाहता नेतृत्व बदलाचा विचार सुरु आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पदावरून पायउतार होण्याचे सूतोवाच दिले आहेत.
‘नेतृत्व बदलावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. आज संध्याकाळपर्यंत याबाबत सर्व चित्र स्पष्ट होईल. मी पक्षश्रेष्ठींकडून नवीन नावाची आशा करतो. तुम्हाला लवकरच याबाबत माहिती मिळेल”, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिले आहेत.दिल्लीच्या हायकमांडकडून हे नाव येणार आहे, असे येडीयुराप्पा म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलाचे वारे सुरु झाले होते. तेव्हा काही नेत्यांची नावे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होती. गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या बंडाळीमुळे भाजपाने दुसऱ्या नेत्याला नेतृत्व देण्याचा निर्णय पक्का केला आहे. दरम्यान कर्नाटकमधील जातीय समीकरणं आणि भाजपसमोरील सध्याच्या अडचणी लक्षात घेता मुख्यमंत्रीपदाची नेमणूक पुढे ढकलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
येडियुरप्पा हे 78 वर्षांचे आहेत. त्यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाकडून पावले उचलण्यास सुरवात झाली आहे. येडियुरप्पा यांना यासाठी मागील आठवड्यात दिल्लीलाही बोलावून घेण्यात आले होते. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही येडियुरप्पा यांनी भेट घेतली. या भेटीत येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. यासाठी येडियुरप्पांनी प्रकृतीचे कारण पुढे केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली
मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत
– प्रमुख नेता बसवराज बोम्मई आणि बी.एल. संतोष यांची नावेही चर्चेत
– केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि खणन मंत्री एमआर निरानी यांचं नाव आघाडीवर
– उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, भाजप नेते मुर्गेश निराणी आणि वसवराज एतनाल यांची नावं देखील चर्चेत
मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची कारकीर्द थोडक्यात
– कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा चौथा कार्यकाळ
– शिकारीपुरातील पुरसभा अध्यक्षापासून राजकीय कारकिर्दीची सुरुवात
– 1983 साली पहिल्यांदा आमदार (शिकारीपुर मतदारसंघ)
– आठवेळा ते या मतदारसंघातून विजयी
– 2018 विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक 110 जागा मिळवत क्रमांक एकचा पक्ष
– भाजपाने 2019 मध्ये काँग्रेस-जेडीयूचे सरकार पाडले. त्यानंतर बीएस येडीयुरप्पा मुख्यमंत्रिपदी