न्याय मिळेना, नेट-सेट पीएच.डी.धारकांचे अनोखे आंदोलन : मुख्यमंत्र्यांना पाठवले शेकडो ई-मेल्स
पुणे – राज्य सरकारने सहायक प्राध्यापक भरती करण्याचा निर्णय अद्याप घेतला नाही. प्राध्यापक भरतीला लवकरात लवकर मान्यता मिळावी, यासाठी नेट-सेट पीएच.डी.धारकांनी रविवारी आगळेवेगळे आंदोलन केले. वर्षा बंगल्यावर धुणी, भांडी कर्मचारी किंवा स्वयंपाकी म्हणून नियुक्त करा, अशा मागणीचे शेकडो ई-मेल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवून त्वरित भरतीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी नेट-सेटधारकांनी केली.
नेट, सेट, पीएच.डी.धारक संघर्ष समितीतर्फे रविवारी ही मोहीम राबविण्यात आली. राज्यातील सेट, नेट पात्र झालेले उमेदवार महाविद्यालयांमध्ये तुटपुंज्या वेतनावर अध्यापन करत आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. राज्य सरकारकडून प्राध्यापक भरतीचा निर्णय घेतला जावा, यासाठी संघर्ष समितीतर्फे वारंवार शासनाला निवेदन दिले आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या उपक्रमात मंत्री उदय सामंत यांना प्रत्येक विद्यापीठात निवेदन दिले. मात्र, प्राध्यापक भरतीचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी संघर्ष समितीतर्फे ई-मेल मोहीम राबवण्यात आली. सरकारला प्राध्यापक भरती करता येत नसेल, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला त्यांच्या घरी धुणी, भांडी करणे, वॉचमन म्हणून नेमणूक करणे, स्वयंपाकी म्हणून काम द्या, बागकाम करण्यासाठी नोकरी द्यावी, अशा मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले आहे, असे नेट-सेट पीएच.डी.धारक संघर्ष समितीचे समन्वयक प्रा. सुरेश देवढे-पाटील यांनी सांगितले.