अतिरिक्‍त कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती तहसील कार्यालयात

पिंपरी – शहरातील खासगी शाळा, महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया अद्यापही सुरु असल्याने विविध दाखले काढण्यासाठी पिंपरी तहसील कार्यालयात विद्यार्थ्यांची गर्दी सुरु आहे. मात्र, तहसिल कार्यालयातील सेतु सुविधा केंद्रातील अडचणीमुळे विद्यार्थ्यांना दाखले मिळविताना विलंब होत असल्याचे वृत्त दैनिक “प्रभात’ने प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत अतिरिक्त चार ते पाच कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

पिंपरी तहसील कार्यालयातील तांत्रिक अडचणींमुळे दाखले मिळविताना विद्यार्थ्याना दहा ते बारा दिवस वाट पहावी लागत आहे. तसेच, कार्यालयात रोज येणाऱ्या अर्जांची संख्या मोठी असल्याने कर्मचाऱ्यांवर ताण येत होता. तसेच, कार्यालयातील तांत्रिक अडचणीमुळे दिवसात पाच ते सहा वेळा सर्व्हर बंद पडत आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेताना उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी, जातीचा दाखला, राष्ट्रीयत्व, अधिवास दाखला यासारखे इतर दाखले काढण्यासाठी विद्यार्थी व पालकांची धावपळ होत असल्याचे दिसत आहे. मात्र, नव्याने अतिरिक्‍त कर्मचारी नेमल्याने विद्यार्थ्यांना दाखले वेळेत मिळणार आहेत.

दोन महिन्यांतील दाखल्यांचे वाटप
पिंपरी तहसील कार्यालयात विविध दाखले काढण्यासाठी गेल्या दीड ते दोन महिन्यापासून गर्दी होत आहे. या कार्यालयात एक एप्रिलपासून रहिवासी दाखल्यासाठी 975 अर्ज आले आहेत. यापैकी 936 दाखल्यांचे वाटप झाले आहे. उत्पन्नाच्या दाखल्यासाठी 3 हजार 47 अर्जांपैकी 2 हजार 92 दाखल्यांचे वाटप, नॉनक्रिमिनलच्या 420 अर्जांपैकी 364 दाखल्यांचे वाटप केले आहे.

अर्जांची संख्या कमी होणार
पुढील काही दिवसात शहरातील बहुतांशी शाळा व महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल. यामुळे, गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत पुढील काही दिवसांत दाखले काढण्यासाठी अर्जांची संख्या कमी होणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कार्यालयात दाखल्यांसाठी रोज 250 ते 300 अर्ज येत आहेत. यामुळे, कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्‍त ताण येत होता. शिवाय विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी या दाखल्याची आवश्‍यकता असल्याने वेळेत दाखले देणे देखील अत्यावश्‍यक आहे. अत्यल्प कर्मचारी आणि कामाचे अत्याधिक प्रमाण यामुळे अडचणी तर येतच होत्या परंतु तांत्रिक यंत्रणाही कोलमडली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here