पुणे : राज्य शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला. आता विद्यार्थ्यांना वरिष्ठ महाविद्यालयातील पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी अर्जाची प्रक्रिया निकालानंतर सुरू करण्यात आली आहे. बहुतांश महाविद्यालयाचे अर्ज त्यांच्या महाविद्यालयावर संकेतस्थळावर उपलब्ध असून, ते सर्व घरी बसून ऑनलाइन पद्धतीने भरावयाचे आहेत. अर्जानंतर गुणवत्ता यादीत नाव निश्चित होताच कागदपत्रांसह संबंधित महाविद्यालयात प्रवेश कन्फर्म करावे लागणार आहे.
राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. मात्र अजून सीबीएसई बोर्डाच्या बारावीचा निकाल जाहीर झाला नाही. त्यामुळे विशेषत: विज्ञान शाखेसाठी सीबीएसई विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे फर्ग्युसनसह काही महाविद्यालयांनी पदवीची प्रवेशप्रक्रिया तातडीने सुरू न करण्याचा निर्णय घेतला. तूर्तास मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. प्रवेशाबाबत अतिघाई करणार नसल्याचे फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी यांनी सांगितले.
आता महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया, समुपदेशनाची प्रक्रिया सुरू होईल. पुण्याबाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे गुणांच्या आधारे प्रवेशासाठी चुरस होऊ शकते. पुणे परिसरातील महाविद्यालयांची माहिती घेऊन प्रवेशासाठी प्रयत्न केल्यास सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळेल. बारावीनंतर सर्वच विद्याशाखांमध्ये विविध नवे अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पदवीसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. त्याचाही विद्यार्थी आणि पालकांनी विचार करायला हवा.
– डॉ. एन. एस. उमराणी, प्राचार्य, गरवारे वाणिज्य महाविद्यालय
बीएमसीसी महाविद्यालयातर्फे विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश पूर्व परीक्षा (सीईटी) घेतली जात असून त्यासाठी सुमारे 3 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 12 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. प्रवेश पूर्व परीक्षा 15 ते 20 जून या कालावधीत होईल. त्यातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना पुढे गुणवत्ता यादी प्रमाणे प्रवेश दिले जातील.
– सीमा पुरोहित, प्राचार्य, बीएमएससीसी
महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी बुधवारी दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन मेरिट अर्ज महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे. पुढील दहा दिवस हा फॉर्म विद्यार्थ्यांना भरता येईल. त्यानुसार गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील.
– डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय