पुणे -‘आरटीई’साठी राज्यातून लाखावर अर्ज

सहा दिवसांत 1 लाख 4 हजार ऑनलाइन नोंदणी

पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार “आरटीई’च्या 25 टक्‍के प्रवेशासाठी राज्यात सहा दिवसांत 1 लाख 4 हजार अर्जांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. यात पुण्यात सर्वाधिक 25 हजार 194 अर्जांची नोंदणी करण्यात आली आहे.

राज्यात 5 मार्चपासून “आरटीई’च्या ऑनलाइन प्रवेशाला सुरुवात झाली आहे. मात्र, सुरुवातीच्या दोन दिवसांत तांत्रिक अडचणींमुळे प्रवेशांची फारशी नोंदणी करण्यात आली नव्हती.

पालकांना ऑनलाइन व मोबाइल ऍपद्वारे अर्ज नोंदणीसाठी पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोर्टलवर ऑनलाइन बरोबरच मोबाइल ऍपद्वारे नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, पालकांकडून मोबाइल ऍपचा फारसा वापर केला जात नसल्याचे उघडकीस आले आहे. दररोजच्या नोंदणीत आता झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. बुधवार ते सोमवार या कालावधीत अर्जांच्या नोंदणीचा टप्पा 1 लाखांच्या पुढे गेला आहे. पालकांकडून जिल्हानिहाय शाळांच्या प्रवेशासाठी नोंदणी करण्यात येऊ लागली आहे. यात पुण्यात सर्वांत जास्त तर सिंधुदुर्गमध्ये सर्वांत कमी अर्जांची नोंदणी झाली आहे. पालकांना अर्ज नोंदणीसाठी 22 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

राज्यात 9 हजार 194 शाळांकडून नोंदणी –
राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 9 हजार 194 शाळांनी नोंदणी केल्यानुसार 1 लाख 16 हजार 818 प्रवेशाच्या जागा दर्शविण्यात आल्या आहेत. यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 963 शाळांमध्ये 16 हजार 619 जागा उपलब्ध आहेत तर सर्वांत कमी सिधुंदुर्ग जिल्ह्यात 46 शाळांमध्ये 353 जागा दाखविण्यात आल्या आहेत. ठाण्यात 652 शाळांमध्ये 13 हजार 400, नागपूरमध्ये 675 शाळांमध्ये 7 हजार 204, नाशिकमध्ये 457 शाळांमध्ये 5 हजार 764, पालघरमध्ये 222 शाळांमध्ये 4 हजार 252, औरंगाबादमध्ये 586 शाळांमध्ये 5 हजार 627, मुंबईत 294 शाळांमध्ये 6 हजार 265 प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. आता या जागांमध्ये फारशी वाढ होण्याची शक्‍यता नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.