राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अतुल देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडी बंडखोरी झाली असून ते अर्ज माघार घेणार की बंडखोरी कायम ठेवणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी अतुल देशमुख यांचे प्रयत्न होते. पक्षाचे नेते शरद पवार यांच्याकडे सर्व उमेदवारांमध्ये अतुल देशमुख यांना 54 टक्के रेटिंग होते. सर्वाधिक रेटिंग असणारे तालुक्यातील देशमुख एकमेव इच्छुक उमेदवार होत
मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा तिकिटासाठी दावा असल्याने शेवटच्या क्षणी अतुल देशमुख याना डावलून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाबाजी काळे याना तिकीट गेले. तथापि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अतुल देशमुख यांनी सद्यातरी बंडखोरीची भूमिका घेत उमेदवारी अर्ज भरला आहे.
येत्या शनिवारी (दि. 2 नोव्हेंबर) ते कार्यकत्यांचा मेळावा घेऊन निवडणूक लढवण्याची भूमिका ते स्पष्ट करणार आहेत. मंगळवारी शेवटच्या दिवशी अतुल देशमुख यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे यांच्याकडे सादर केला यावेळी सचिन लांडगे, संदीप रासकर, विकास ठाकूर,हरीश देखणे उपस्थित होते. दरम्यान त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.