नगर – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व विजाभज, इमाव व सामाजिक शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मागासप्रवर्ग व विमाप्र कल्याण विभागाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाच्या संकेतस्थळावर दिनांक 15 नोव्हेंबर 2019 पर्यत अर्ज भरण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे.
या संकेतस्थळावरुन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व विजाभज, इमाव व सामाजिक शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मागासप्रवर्ग व विमाप्र कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती, राज्य शासनाची शिक्षण व परीक्षा फी प्रतीपूर्ती या शिष्यवृत्ती योजना ऑनलाइन करण्यात आलेल्या आहेत.
शैक्षणिक सन 2019-20 वर्षासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आणि महाविद्यालयांचे प्रोफाईल अद्ययावत करणे आणि शैक्षणिक शुल्क ऑनलाइन मंजूर करण्यासाठी दिनांक 15 नोव्हेंबर 2019 ही अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी विहित कालावधीत शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करावेत. महाविद्यालयांनी आपले प्रोफाईल अद्ययावत करुन शैक्षणिक शुल्क ऑनलाइन मंजूर करुन घ्यावे.
विहित कालावधीत विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्याबाबत महाविद्यालयाने आवश्यक ती कार्यवाही करावी, असे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त पांडूरंग वाबळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. शिष्यवृत्तीचे अनेक प्रस्ताव पाठवूनही वारंवार ते प्रलंबित राहतात त्यामुळे अनेक जण प्रस्ताव पाठविण्याकडे कानडोळा करतात.