जामखेडमधील दोन हजार शेतकऱ्यांचे भरपाईसाठी अर्ज

जामखेड – तालुक्‍यात मागील पंधरवाड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे चार हजार तीनशे नव्वद हेक्‍टरवरील खरीप पिके उद्‌ध्वस्त झाली आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या पिकाचा विमा परतावा मिळावा, या अनुषंगाने तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी मंगळवारपर्यंत दोन हजार 147 शेतकऱ्यांचे नुकसान अर्ज विमा कंपनीकडे सादर केले असल्याची माहिती तालुका कृषी विभागाकडून देण्यात आली.

तालुक्‍यातील 80 टक्के शेतकऱ्यांनी ऑनलाईन विमा उतरवला होता. मात्र आता हे नुकसान अर्जाचे नाटक विमा कंपनीने सुरू केले असल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप होऊ लागला आहे. यंदा तालुक्‍यात सुरुवातीपासूनच पर्जन्यमान चांगले असल्याने पीक परिस्थिती एकदम चांगली होती. मात्र खरिपातील सोयाबीन, मका, ज्वारी, कपाशीची सोंगणी व वेचणी सुरू होण्याच्या काळातच तब्बल पंधरा दिवसांच्या अवकाळी पावसाने जवळपास 4 हजार 113 हेक्‍टरवरील पिकाचे नुकसान केले आहे. यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने पिके खराब झाली आहेत. मका व सोयाबीन पिकाला पावसाचा अतिरिक्त फटका बसल्यामुळे या पिकांना देखील अंकुर फुटल्याने शेतकऱ्यावर संकटाची दरड यावर्षी कोसळली आहे.

सध्या प्रशासन देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्राप्त परिस्थितीचा आढावा घेऊ लागले आहे. अवेळी कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्‍यातील 72 गावांत झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सेवकांची या तिघांची नियुक्त करून तातडीने अहवाल देण्याचे आदेश तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी गेल्या आठवड्यात दिले होते.

महसूल विभागाकडे 12 नोव्हेंबरपर्यंत अहवालानुसार एकूण 6 हजार 169 बाधित शेतकरी संख्येपैकी 4 हजार 113 हेक्‍टरचे पंचनामे झाले आहेत. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान पुढील चार दिवसांत शिल्लक क्षेत्रांचे पंचनामे पूर्ण करण्याचे काम यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे युद्ध पातळीवर पूर्ण करावे लागणार आहेत. अवेळी आलेल्या या पावसामुळे मेहनतीने पिकलेल्या खरिपाचा हंगामात हातातून गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.