दि.29 फेब्रुवारीपर्यंत मुदत : आतापर्यंत अडीच लाख अर्ज
पुणे – अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी अनिवार्य असलेली सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सीईटीसाठी अर्ज करण्याची मुदत दि.29 फेब्रुवारीपर्यंत आहे. आतापर्यंत “एमएचटी-सीईटी’साठी अडीच लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
राज्य सीईटी सेलमार्फत केंद्रीय पद्धतीने व ऑनलाइनद्वारे ही प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर करण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना ऑनलाइन अर्ज करून कन्फर्म करावे लागेल. त्यानंतरच विद्यार्थ्यांना “एमएचटी-सीईटी’ परीक्षेला बसता येईल. मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत 2 लाख 54 हजार 447 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यातील 2 लाख 26 हजार 406 विद्यार्थ्यांनी अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. तसेच 28 हजार 51 विद्यार्थ्यांनी अर्ज अर्धवट भरले असल्याची माहिती राज्य सीईटी सेलकडून देण्यात आली. दरम्यान, यापुढील प्रक्रियादेखील तातडीने सुरू करण्यात आल्याचे सीईटी सेलच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सीईटीचे शुल्क निश्चित
“एमएचटी-सीईटी’ परीक्षेसाठीचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. “पीसीएम’ आणि “पीसीबी’ या दोन्ही ग्रुपची परीक्षा देणाऱ्यांना स्वतंत्रपणे शुल्क आकारले जाणार आहे. पीसीबी किंवा पीसीएम यापैकी कोणत्याही एका ग्रुपमधून परीक्षा देत असताना खुल्या गटासाठी 800 रुपये तर, आरक्षित गटासाठी 600 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. जर विद्यार्थी दोन्ही गटातील अभ्यासक्रमाची परीक्षा देणार असेल, तर खुल्या गटासाठी 1 हजार 600 रुपये तर आरक्षित गटासाठी 1 हजार 200 रुपये शुल्क आकारले जाईल. हे शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शुल्क भरण्यापूर्वी अर्ज व्यवस्थित तपासून घ्यावा, त्यानंतर पैसे भरावेत असे आवाहन सीईटी सेलचे आयुक्त संदीप कदम यांनी केले आहे.
राज्य सीईटी सेलच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी तंत्रशिक्षण विभागांतर्गत पदवी व पदव्युतर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज स्वीकृती केंद्रे व प्रवेश निश्चिती केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या संस्थांनी गेल्या तीन वर्षात “एनबीए’ मूल्यांकन करून घेतले आहेत, अशा संस्थांनी दि.15 फेब्रुवारीपर्यंत माहिती सादर करावीत.
– डॉ. सुभाष महाजन, परीक्षा समन्वयक, राज्य सीईटी सेल