कॅलिफोर्निया: भारत आमच्यासाठी एक महत्त्वाची बाजारापेठ असून ती भविष्यातील वाटचालीसाठी खूप लाभदायक ठरणार असल्याचा विश्वास अॅपल कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी व्यक्त केला आहे. आगामी काळात पायाभूत सुविधामध्ये वाढ करत ऍपलच्या ब्रॅंडसाठी स्वतंत्र किरकोळ दुकानाची उभारणी करणार असल्याचे यावेळी म्हटले. याकरिता लवकरच भारत सरकारसोबत चर्चा सुरू करणार असल्याचे कुक माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले आहे.
भारतात आम्ही व्यवसाय उभारताना या अगोदर काही गोष्टीमध्ये खूप तडजोड केली असल्याचे त्यांनी म्हटले. आगामी काळात आपले स्थान मजबूत करण्यासाठी भारतात कोणती योजना आखायची आणि कोणती नाही यांचा अभ्यास करत असून आम्हाला खूप काही शिकायला मिळत असल्याचे कुक यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून ऍपलचे वितरक विस्ट्रॉनने बेंगळुरू येथील प्रकल्पात आयफोन -7 साठी आवश्यक असणारी पायाभूत यंत्रणा उभारली असून आयफोन-6 चे उत्पादन या अगोदच सुरू केल्याचे अॅपलने नमूद केले आहे.