आज काय धमाल आली ना, विज्ञानाच्या तासाला!’ “हो रे, आहाराची सापशिडीमुळे कोणता पदार्थ तब्येतीसाठी चांगला व कोणता नाही ते किती छान समजलं.’
“ज्यात पोषक पदार्थ असतात, आरोग्य चांगले ठेवतात, असे पदार्थ आले की चला शिडीने वर.’
“आणि आरोग्याला हानीकारक पदार्थ आले की या सापाच्या तोंडातून खाली.’ प्रणव, मिहीर, सानवी आणि तन्वीच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या.
“मॅमनी होमवर्क दिला आहे, लक्षात आहे ना? सापशिडीमध्ये ज्या पदार्थांचा उल्लेख होता, ते पोषक का आहेत किंवा का नाहीत ते शोधायचे आहे.’ प्रणवने आठवण करून दिली.
“पण मग कोणत्या पदार्थांना पोषक पदार्थ आहेत असे म्हणता येईल, असे वाटते?’
“मिहीर, मला वाटते ज्या पदार्थांमध्ये विविध जीवनसत्त्वे, प्रथिने असतील ते पोषक पदार्थ.’
“तन्वी, त्याशिवाय आहारात क्षारयुक्त आणि तंतुमय पदार्थही असायला हवेत.’ प्रणवने तन्वीच्या बोलण्याला जोड दिली.
“हं. जीवनसत्त्वांमुळे रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते व शरीराची विविध कार्ये सुरळीत चालतात.’ “आणि सानवी, प्रथिने शरीर बांधणीसाठी, शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी गरजेची आहेत. प्रथिनांमुळेही रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते.’ मिहीरने सांगितले.
“कर्बोदके, खनिजे, क्षार आणि पाणी यांचे महत्त्व पण माहिती करून घ्यायला हवे.’ सानिकाने पुढचा मुद्दा उपस्थित केला. “अगं सानिका, कर्बोदके व स्निग्ध पदार्थ यांच्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते काम करण्यासाठी.’ प्रणवने वेगळाच मुद्दा मांडला, “पाण्याशिवाय माणूस चार पाच दिवससुद्धा राहू शकत नाही. शरीराचे तापमान योग्य राहण्यासाठी पाणी फार महत्त्वाचे आहे.’
“आणि मुलांनो शरीरातील नको असलेले पदार्थ बाहेर टाकण्यासाठीही पाणी गरजेचे आहे बर का.’ प्रणवच्या आईनेही संवादात सहभाग घेतला.
“बरं झालं आई तू आलीस ते. आजच्या खेळात कोल्ड्रिंग मात्र पोषक नाही, असे बाईंनी सांगितले. त्यात तर पाणी असते!'”कोल्ड्रिंग म्हणजे फक्त पाणी आहे का?’ प्रणवच्या आईने विचारले. “नाही ते गोड असते म्हणजे त्यात साखर असणार,’ नेहमीप्रमाणे मिहीरने कारणासहित उत्तर दिले. “आणि काकू, ते पिल्यावर ढेकर येते व नाकात खूप झिणझिण्या येतात.’ तन्वी तोंड वाकडे करत बोलली.
“कोल्ड्रिंगमध्ये थोडीशी नव्हे तर भरपूर साखर असते. शिवाय हे पाणी कार्बोनेटेड असते. म्हणजेच कार्बन डायऑक्साइड विरघळवलेले पाणी असते, त्यामुळे ढेकर येते. तुम्हाला माहीत आहे का, कोल्ड्रिंग आम्लधर्मीयही असतात. त्यामुळे दातांची व हाडांची झीज होणे, शरीरात ऍसिडिटी वाढणे असं बऱ्याचदा कोल्ड्रिंगमुळे होऊ शकते.
शिवाय यात पोषणमूल्ये काहीच नाहीत. टिकण्यासाठी म्हणून रासायनिक प्रिझर्व्हटीव्ह वापरलेली असतात. मग सांगा आता, कोल्ड्रिंग पोषक आहारात येईल का? हेही लक्षात ठेवा, फळांचा ज्यूस पिण्याऐवजी फळे खावीत. त्यामुळे फळातील सर्व घटक शरीराला मिळतात.’
“पण, मग काकू एक प्रश्न आहे, जर हे हानीकारक आहे तर त्यांची जाहिरात मात्र किती केली जाते?’
“तन्वी खरं आहे तुझं. जाहिरात हा विक्री कौशल्याचा भाग आहे. पण योग्य काय, अयोग्य काय, हे समजण्याची विचारशक्ती तर आपल्यात आहे ना. “अति सर्वत्र वर्जयेत’ हे सुभाषित आपण नेहमी लक्षात ठेवायचे. कळलं का मुलांनो.’ तुम्हालाही कळलं ना बालमित्रांनो?
– विशाखा गंधे