नियोजन हा आपल्या आयुष्यातील अत्यंत गरजेचा व तितकाच महत्त्वाचा घटक आहे. आपण कोणतेही काम नियोजनबद्ध पद्धतीने केले तर दर्जेदार होते. केवळ कामच असे नव्हे, तर साधन सामग्रींचे, पैशांचे अशा प्रत्येक घटकाचे नियोजन आपल्याला आयुष्यात करणे महत्त्वाचे आहे.
आपण नियोजन करण्याची गरज आधी समजून घेतली पाहिजे. नियोजन करण्यासाठी आधी आपण आळस तनातून आणि मनातून झटकून टाकला पाहिजे. नियोजन न करण्यामागे आळस हेच एक कारण असते. जेव्हा एखादे काम पूर्ण करण्याची शेवटची वेळ येऊन ठेपते अशा वेळी धावत-पळत काम पूर्ण केले जाते. अशा वेळी काम फक्त दिलेल्या वेळेत पूर्ण करणे एवढेच महत्त्वाचे होऊन जाते. कामाचा दर्जा राखण्याकडे दुर्लक्ष केले जाते. मुळात आपण कामाचे नियोजन करण्याचे का टाळतो तर जेव्हा नियोजनासाठी व काम पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ असतो त्यावेळी आपण आळस करतो. त्या दिवशी त्या कामाची निकड नसते म्हणून आपण काम व नियोजन दोन्ही टाळतो. हा आळस आपण झटकून टाकायचा आहे, त्यासाठी आपण स्वतः मनातून उचल घेतली पाहिजे.
नियोजन न करता आपण जर काम केले तर सामग्री व वेळ जास्त वापली जातो. त्यामुळे आपल्याला खूप नुकसान सोसावे लागते. हेच आपण टाळू शकतो आणि नियोजन करण्यासाठी प्रत्येक वेळी पैसा खर्च करावा लागतोच असे नाही. फक्त काळजीपूर्वक विचार करावा लागतो. आपण नियोजनाकडे दुर्लक्ष केले तर एका कामाचा दुसऱ्या कामवर विपरीत परिणाम होत असतो. आत्ता हातात असलेले काम नियाजेनाच्या अभावामुळे घाई गडबडीत पूर्ण करावे लागते, त्यामुळे आजचा दिवस जातोच पण पुढच्या कामाचेही नियोजन करण्याचे सूचत नाही. पुन्हा पुढच्या कामाचा बोजवारा आजपासूनच सुरू होतो. यामुळे एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था होऊन जाते.
आपण एखाद्याला आपले काम पूर्ण करून द्यावयाचे असते, त्यावेळी त्या व्यक्तीचेही नियोजन आपल्या कामावर अवलंबून असते.
आपण त्या व्यक्तीस नियोजित वेळेत जर काम पूर्ण करून दिले नाही तर त्याचे काम विस्कळीत होते. याशिवाय निम्न दर्जाचे काम करून दिल्यामुळे त्याच्याकडूनही तक्रारी येतात. याचा परिणाम आपल्या कामगिरी तसेच उत्पन्नावरही होतो. काही क्षेत्रे अशी असतात की जेथे नियोजन खूपच गरजेचे असते. उदाहरणार्थ आपण कोणताही चित्रपट पाहतो तर तो बनविताना कसे नियोजन केले असेल या दृष्टीनेही पाहावा. एखाद्या चित्रपटात जर न्यायालयाचे दोन प्रवेश असतील तर दोन्ही प्रवेश सलग चित्रीत केले जातात. मग त्यावेळचे कपडे, इतर वस्तू आणि बरेच काही यांचेही संदर्भ चूकता कामा नये यासाठी काटेकोर नियोजन करावे लागते. नाहीतर ज्याची साक्ष तो घरातून निघताना निळा सदरा घालून निघतो पण न्यायालयात मात्र पांढऱ्या सदऱ्यावर पोहोचतो, पण असे होत नाही याला कारण नियोजन. याशिवाय जर नियोजन केले नाही तर चित्रपटाचा विनाकारण खर्चही अव्वाच्या सव्वा वाढत जाऊ शकतो.
वेळेचे, सामग्रीचे करावे लागते तसेच किंबहुना अधिकच पैशांचे काटेकोरपणे नियोजन करणे आवश्यक असते. नाहीतर ऐन वेळेस जेव्हा पैशांची गरज भासेल तेव्हा पैसे नसतात मग कर्ज घ्यावे लागते आणि अर्थात शंभर रुपयांची वस्तू कर्जाने घेतल्यामुळे एकशे साठ रुपयांना पडते. वरचे साठ रुपये व्याजाचे पैसे आपल्या नियोजनाच्या अभावाचे मूल्य असते. दुसऱ्या शब्दांत आपण स्वतःसाठी पैसे न मिळविता दुसऱ्यासाठी मिळवितो. बॅंकेकडून कर्ज घेतले तर व्याजाची रक्कम आपण फेडतो म्हणजेच बॅंकेसाठी आपण काम करतो. हेच आर्थिक नियोजन जर व्यवस्थित केले तर बॅंकच आपल्यासाठी काम करते. कारण आपण बॅंकेत पैसे ठेवले म्हणजे बॅंक आपल्याला व्याज देणार. आपला पैसे मिळविण्याचा जो कालावधी आहे त्या कालावधीतच निवृत्ती वेतन मिळेल अशी पैशांची तरतूद व नियोजन करण्याची नितांत आवश्यकता आहे. नाहीतर वृद्धापकाळात हालाखीचे जीवन जगणारे कितीतरी वृद्ध आज दिसतात, त्यांच्या कळपात आपण उद्या जाऊन बसणार. मनी, मॅन, मशीन व मटेरियल, मिनिट या पाच “एम’चे नियोजन व व्यवस्थापन आपल्या व्यवसाय व आयुष्यात करणे आवश्यकच आहे. त्याला पर्यायच नाही.
नियोजन करण्यासाठी आपण आपल्यात अनुकूल बदल घडवून आणले पाहिजे. यासाठी कामाचा विचार करणे आवश्यक असते. कामात येणाऱ्या संभाव्य अडचणी, उपलब्ध साधन सामग्री, वेळ यांचा उपयोग कसा करून घ्यावा याचा विचार करावा. तसेच कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त चांगले व दर्जेदार काम कसे करता येऊ शकते याचा विचार करावा. एकदा विचार पक्का झाला की आपोआपच त्या विचाराप्रमाणे कृती करायला सुरुवात करतो. आपल्या विचारांना चालना देण्याचे आपण फक्त मनावर घेतले पाहिजे. आपण जर मनावरच घेतले नाही तर सगळ्याच कामाचा विचका होणार हे निश्चित. नियोजनाच्या अभावामुळे कामाचाच नव्हे तर आयुष्याचाही विचका होऊन बसू शकतो हा धोका फार मोठा आहे. आपल्या काय फायद्याचे आहे हे आपण ठरविण्याइतके निश्चित हुशार आहोत.
नियोजन फसू नये म्हणून फार बारीक सारिक गोष्टींचा, कृतींचा विचार करावा लागतो. नाहीतर ऐन वेळी एखाद्या क्षुल्लक कारणामुळे सगळ्या योजनेचा पचका होऊ शकतो. पूर्वतयारीमुळे आपल्याला संभाव्य समस्यांचा अंदाज येऊ शकतो आणि त्यावर उपायही शोधायला वेळ मिळतो. नियोजन प्रत्यक्ष अंमलात आणण्याच्या वेळी आपण उत्तम कामगिरी करू शकतो. याशिवाय आपल्याला नियोजन “ब’ तयार करून ठेवणे आवश्यक असते. आपण कितीही पूर्वतयारी केली तरी आयत्यावेळच्या काही अडचणी वेगळ्याच असतात. त्यामुळे आपले मूळ नियोजन फसू शकते. याचसाठी दुसरे नियोजन आपल्याकडे तयार असणे आवश्यक असते. आपल्याला आपले काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी नियोजन हे आवश्यकच आहे. असेच एक एक काम यशस्वीपणे करत आपण जीवनात यशस्वी होणार आहोत, ही एक साखळीच आपल्याला गुंफायची आहे. आपल्या कामाला, परिश्रमांना योग्य दिशा देण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. गरज आहे ते मनावर घेण्याची. आपण आपल्या मनोदेवतेस अशाच अनेक नियोजनांचे पुष्प अर्पण करत गेलो तर विजयाची पुष्प माला आपल्या गळ्यात पडणार आहे यात शंकाच नाही.
– अनिकेत भालेराव