अहा! प्रणव किती बर्फ आहे रे? खूप मजा आली असेल ना? बर्फात खेळलात का रे? स्केटिंग केली?’ “अरे खूप धमाल आली. स्केटिंग खूप सोप असेल असे वाटले खरं, पण पार वाट लागली हं शिकताना.स्केटिंग्ज् बूट घालायचे आणि दोन्ही हातात काठ्या धरून तोल सावरायचा. हे बूट तर तळाशी सुरीसारखे धारधार असतात. ज्यांना सराव असतो ते अशा बुटांवर तोल सांभाळत सरसर बर्फ कापत वेगाने मस्त पुढे जातात, पण आपल्यासारखे नवशिके मात्र धपाधप पडतात.’
“प्रणव स्केटिंग्ज् बूट तळाशी सुरीसारखे धारधार असतात तर त्यांनी बर्फ कापला जात असेल ना?’ सान्वीने विचारले.
“नाही ना! असं कसं, हा मलाही प्रश्न पडला होता तेव्हा.’ प्रणव उत्तरला.
“काय मुलांनो, असं कसं घडते ते पाहायचे का? शेजारी काकूंनी आइस्क्रीम करायला बर्फ आणले आहे.आइस्क्रीम खायला बोलावले आहेच तुम्हा सगळ्यांना. तेथे जाऊन प्रयोगही करू.’
“पण स्केटिंग्ज् बूट कुठे आहेत आपल्याकडे?’
सानियाच्या या शंकेवर प्रणवच्या आईने हातातली तांब्याची तार व दोन भांडी दाखवली आणि हे बास आहे प्रयोगासाठी म्हणाल्या.
काकू कसा प्रयोग करतात ते मुले उत्सुकतेने बघत होती. प्रणवच्या आईने तारेच्या दोन्ही बाजूला भांडी अडकवली आणि ती तार स्टुलावर ठेवलेल्या बर्फाच्या लादीवर ठेवली. बर्फावरून दोन्ही बाजूला लटकत असलेल्या त्या भांड्यांमध्ये काकूंनी पाणी ओतले. नंतर त्या भांड्यांना धरून तार हळूहळू खाली खेचली.तार बर्फातून खाली खाली जाऊ लागली अन् बर्फातून आरपारही गेली, पण त्या बर्फाचे तुकडे मात्र झाले नाहीत.
“सांगा बरं आता काय काय पाहिलेत?’ ते प्रणवच्या आईने विचारले.
“काकू, तुम्ही तार खाली खेचलीत तसे तेथील बर्फ जरासे वितळले. तेथे अगदी थोडे पाणी दिसत होते.’ मिहीरने सांगितले.
“आणि आई, तार खाली गेल्याबरोबर त्या पाण्याचे लगेच बर्फात रूपांतर झाले.’
“प्रणव, मिहीर छान निरीक्षण केलेत बरं. तारेच्या दाबामुळे बर्फावर तेथे तात्पुरती उष्णता निर्माण झाली आणि त्यामुळे तिथला बर्फ वितळला. तार खाली गेली की उष्णता नाहिशी झाली. त्यामुळे पाण्याचे परत बर्फात रूपांतर झाले. ही तार पूर्णपणे खाली येईपर्यंत असे घडत होते.’
“म्हणजे मी स्केटिंग करताना माझ्या वजनामुळे तिथला बर्फ वितळला; पण जसा मी पुढे गेलो तसा त्या पाण्याचा परत बर्फ झाला.’ प्रणव स्केटिंगचा अनुभव आठवत बोलला.
“पाण्यामुळे प्रणवला पुढे घसरणे आणि तारेला खाली येणे सोपे जात होते. हो ना’ मिहीरने विचारले.
“एकदम बरोबर आणि पाण्याचा परत बर्फ झाल्याने तेथील बर्फ परत जोडला जात होता. त्यामुळे बर्फ कापला गेला; पण त्याचे तुकडे झाले नाहीत.’ प्रणवच्या आईने मूळ प्रश्नाचे उत्तर दिले.
“तुमच्या मनात शंका निर्माण होतात, त्या विचारता आणि त्याची उत्तरे शोधता, हे तुमच खरं शिकण आहे बरं.’ मुलांच्या हातात घरी केलेले पॉट आइस्क्रीम देत शेजारच्या काकूंनी कौतुक केले.
“काकू आइस्क्रीम तर खूपच छान झाले आहे. एक विचारू?’
मिहीरचे बोलणे पूर्ण होत नाही तोच सगळे जण एकासुरात ओरडली, “मिहीर… आता शंका नको रे.’
“अरे ऐका तर. काकू आइस्क्रीम भरपूर आहे ना? अजून मिळेल ना?’
विशाखा गंधे