माझ्या एका मित्राची एक समस्या होती. त्याच्या मुलीला मेडिकलला जायचं होतं. मित्राला खर्च परवडण्या सारखा नसल्यानं विरोध होता. तडजोड म्हणून कन्या कमी खर्चाच्या दंत वैद्यकीय अभ्यासक्रमास तयार झाली. पण प्रवेश मिळाला लांबच्या गावी! मुलीला दूर पाठवायची मित्राची तयारी नव्हती तर इकडे मुलगीही हट्ट सोडायला तयार नव्हती. आली का पंचाईत. मी मित्राला सल्ला दिला की, मुलीनं कॉम्प्रोमाइज केला आहे तर तुलाही एक पाऊल मागे घ्यायला हवं.
अखेर मुलीनं दूरच्या गावी दंत वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि आई-वडील अधूनमधून तिला भेटायला जाऊ लागले. तसं पाहायला गेलं तर दोघांचंही बरोबर होतं किंवा दोघांचंही चूक होतं. म्हणजेच जीवनात समोर येणाऱ्या परिस्थितीत काही गोष्टी चूक आणि बरोबर अशा पेट्यांमध्ये टाकता येत नाहीत. यालाच “ग्रे शेड्स’ किंवा “करड्या छटा’ म्हणतात.
“ब्लॅक अँड व्हाइट’ सिनेमा असा आपण उल्लेख करतो पण तो चित्रपट खरा ब्लॅक अँड व्हाइट नसतो.
म्हणजे चित्रपटात फक्त काळी आणि पांढरी यातच विभागल्या जाणाऱ्या छाया नसतात तर तो चित्रपट करड्या रंगाच्या विविध छटांनी भरलेला असतो. जीवनाचंही असंच असतं. मुलानं किंवा मुलीनं आपल्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, असं पालकांना वाटत असतं परंतु मुलाच्या किंवा मुलीच्या आकांक्षा वेगळ्या असतात आणि त्या पालकांच्या इच्छांना छेद देणाऱ्या असू शकतात. यासाठी ज्या व्यक्तीच्या बाबत आपण अपेक्षा ठेवीत असतो त्या व्यक्तीच्या भिंगामधून पाहण्याची आवश्यकता असते. कारण दोन्ही पक्ष एकाच वेळी चूक आणि बरोबर असू शकतात.
आयुष्यातील प्रसंग गणितात मांडता येण्यासारखे नसतात. खूपशा घटना किंवा निर्णय चूक किंवा बरोबर; योग्य वा अयोग्य; नैतिक अथवा अनैतिक अशा गटांमध्ये विभागता येणं शक्य नसतं. यामध्ये दोन्ही प्रकारांचं मिश्रण असू शकतं. उदाहरणादाखल आपण महाभारताकडे पाहू. पांडवांची वृत्ती नैतिकदृष्ट्या सर्वथैव योग्य म्हणता येईल का? तसंच कौरवांना पूर्णत: वाईट म्हणता येईल का? म्हणजे, पांडव आणि कौरव या दोहोंमध्ये करड्या छटा आढळून येतील.
अगदी अलीकडील इतिहासात डोकावलं तरी अशा करड्या छटा जागोजागी सापडतील. आपण आपल्या व्यक्तित्वाचा अभ्यास केला तर त्यातही आपण घेतलेले अनेक निर्णय करड्या छटांत वर्ग करता येतील. आपल्या स्वभावात अनेक परस्परविरोधी गुणांचं अस्तित्व दिसेल. याच आपल्या करड्या छटा.
ई. एल. जेम्स या ब्रिटिश लेखकानं “फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ ही कादंबरी 2011 साली लिहिली आणि ती तुफान गाजली. कादंबरी जरी कामुक वळणावरची असली तरी तीमध्ये ग्रे नावाच्या प्रमुख पात्राच्या व्यक्तिविशेषातील विविध छटा दाखवल्या आहेत. ग्रे हे जरी व्यक्तीचं नाव असलं तरी लेखकाला कोणत्याही साच्यात न बसणाऱ्या आणि परस्परविरोधी छटांचं म्हणजेच करड्या छटांचं अस्तित्व अभिप्रेत आहे. या कादंबरीवर पुढे चित्रपटही निघाला.
गणितासारखं अचूक आणि परिपूर्ण शास्त्रही करड्या छटांतून सुटलेलं नाही. शून्य म्हणजे काहीच किंमत नसलेल्या संख्ये(?)ला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कोणत्याही संख्येला शून्यानं भागल्यास “अनंत’ असं उत्तर मिळतं. पण तेही करड्या छटेचं आहे. ऋण 1 या संख्येचं वर्गमूळ ही आणखी एक करडी परिकल्पना. गणितात बसत नसलेल्या या राशीचा विज्ञानात मोठ्या प्रमाणात उपयोग होतो.
करड्या छटेत बसणाऱ्या कल्पनांचा अर्थ उमगत नसला तरी त्यांचा उपयोग मोठा आहे आणि व्याप्तीही विशाल आहे. विश्वाचा शोध घ्यायचा असेल तर करड्या छटा मान्य केल्याच पाहिजेत. भौतिकातही करड्या कल्पना अधिराज्य करून आहेत. प्रकाश या शक्तीचा व्यवहारही करड्या छटांमध्येच मोडणारा आहे. कधी तो कणांच्या रूपानं प्रकट होतो तर कधी तरंगांच्या रूपानं. एवढंच वर्गीकरण न करता येणाऱ्या करड्या छटा सर्वत्र आहेत- अगदी आपल्यातसुद्धा!
श्रीनिवास शारंगपाणी