रिक्षा सेवेच्या त्रासाबद्दल लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांना पत्रे लिहिण्याचे आवाहन

मुजोर रिक्षाचालकांना कोण आवरणार? जनतेतून संतप्त प्रतिक्रिया
सातारा (प्रतिनिधी) – रिक्षाचालकांकडून प्रवाशांना आकारण्यात येणारे जादा भाडे व मुजोरीमुळे सातारकर वैतागलेले असून या संदर्भात प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांमधून आवाज उठवूनही आरटीओ आणि वाहतूक पोलीस त्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त होत आहेत. साताऱ्यात रिक्षाची उत्तम सेवा मिळावी आणि मुजोर रिक्षाचालकांना चाप बसावा म्हणून माजी खासदार उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आदी लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशा शासकीय विभागप्रमुखांना सातत्याने पत्रे लिहावीत, असे आवाहन ज्येष्ठ कर सल्लागार व सामाजिक कार्यकर्ते अरुण गोडबोले यांनी वाघमोडे यांच्या फेसबुक पोस्टद्वारे केले आहे.

सातारा शहराला ऐतिहासिक परंपरा आहे, तशीच सर्व समाज सद्‌भावनेने, सलोख्याने एकत्र नांदत असल्याची परंपरा आहे. पायाभूत व नागरी सुविधांबाबतही सातारकर अतिशय सहनशील आहे. त्याचाच गैरफायदा अनेक क्षेत्रात घेतला जात आहे. लोकप्रतिनिधींसह शासकीय अधिकारी जनतेच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करत आहेत. साताऱ्यातील सर्वच रस्त्यांची गेल्या काही वर्षांपासून असलेली दुरवस्था, हे त्याचेच मोठे उदाहरण आहे. ही प्रवृत्ती अलीकडे सर्वच क्षेत्रात फोफावत आहे.

साताऱ्यातील रिक्षाचालकांची मुजोरीदेखील नागरिकांना नवी नाही. गेल्या काही वर्षांमध्ये रिक्षा व्यवसाय फोफावला असून अनेक अपप्रवृत्तींचा सामना लोकांना करावा लागत आहे. रिक्षाचालक मनमानी भाडे आकारत असून विशेषत: वृद्ध, महिला प्रवाशांना जुमानत नाहीत. रात्री-अपरात्री अडलेल्या प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे उकळले जात आहे. या विरोधात प्रसारमाध्यमांनी अनेक वेळा आवाज उठवला आहे. सामान्य नागरिकांनीही फेसबुक, व्हॉटस्‌ऍप आदी समाज माध्यमांमधून आपल्या समस्यांना वाचा फोडली आहे. मात्र, आरटीओ कार्यालय आणि वाहतूक पोलिसांवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनाही या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही तर लोकप्रतिनिधी फक्‍त रिक्षाचालकांच्या संघटना स्थापन करून त्यांच्या प्रश्‍नांवरच आवाज उठवताना दिसत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना कोणीही वाली आहे का, असा प्रश्‍न आहे.
फेसबुक पोस्टद्वारे आवाहन
या समस्येवर नारायण बी. वाघमोडे (रा. पिंपळी बुद्रुक, हल्ली मु. सातारा) यांनी फेसबुक पोस्टद्वारे नव्याने आवाज उठवला आहे. प्रवाशांना मीटरप्रमाणे भाडे न आकारता, मनमानी करून, अडवून वाटेल ते भाडे रिक्षाचालक उकळतात, अशा तक्रारी गेले वर्षभर वर्तमानपत्रांमधून सारख्या प्रसिद्ध होत होत्या. याबाबत वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींनीही बातम्या व लेख प्रसिद्ध करून या समस्यांना वाचा फोडली होती; पण त्याचा काहीही उपयोग झालेला दिसत नाही. सातारच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून शाहूपुरी, मंगळवार पेठ, सदरबझार येथे जाण्यासाठी रिक्षाचालकांकडून रात्री 8 नंतर 40-45 रुपयांच्या जागी 90-100-120 रुपयांपर्यंत काहीही भाडे आकारले जाते. अडलेला प्रवासी, महिला, मुले किंवा वयस्कर नागरिक असतील तर त्यांचा नाईलाज होतो. याकडे आरटीओ, पोलीस कोणीच लक्ष देत नाहीत. आम्हाला कोण काय करणार, अशी मुजोरी रिक्षावाले करतात. मग, सामान्य जनतेने काय करावे, हा प्रश्‍नच आहे.

मुंबई हायकोर्टाने इलेक्‍ट्रॉनिक मीटर लावणे सक्‍तीचे केले असले तरी मीटरप्रमाणेच रिक्षाभाडे घेतले जाते की नाही, हे कोण पाहणार? वाहतूक पोलीस चौकाचौकात उभे राहून वाहनचालकांकडून दंड गोळा करतात. मात्र, त्यांना रिक्षाचालकांच्या मुजोरीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. यावर काही मार्ग काढता येईल का? मला वाटेत ज्यांनी हा त्रास सोसला आहे, त्या प्रत्येकाने फक्‍त तीन रुपये खर्च करून सहा पोस्टकार्डे आणावीत. त्या प्रत्येकावर रिक्षा सेवेच्या समस्या लिहून एकेक कार्ड जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी खासदार उदयनराजे भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि मुंबई हायकोर्टाला पाठवावीत. अशा प्रकारे किमान पाच हजार पोस्टकार्डांचा पाऊस पाडल्यास कदाचित या समस्येवर काही तरी मार्ग निघेल, अशी आशा आहे, असे वाघमोडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

रिक्षाचालकांनी परंपरा जपावी
ज्येष्ठ कर सल्लागार अरुण गोडबोले यांनी वाघमोडे यांची पोस्ट शेअर करतानाच त्यावर आपले विचार मांडले आहेत. सातारा शहरात रिक्षा सुरू झाल्यापासूनच्या काळाचा मी साक्षीदार आहे. तेव्हापासून रिक्षाचालकांनी सदैव उत्तम व लोकस्नेही वागणुकीची परंपरा निर्माण करून ती जपली होती. मात्र, अलीकडच्या काळात ही परंपरा संपत जाईल काय, अशी शंका वाटते. कारण, अनेक प्रवाशांच्या तक्रारी वाढत आहेत. मला रिक्षाने जायची वेळ कमी वेळा येते खरी, पण आजच मला एकाने पाठविलेली फेसबुक पोस्ट त्याचेच द्योतक असल्याने, मी ती शेअर करत आहे, संबंधित मंडळी लक्ष देऊन सुयोग्य बदल घडवून आणतील आणि चांगली परंपरा अबाधित राहील, एवढीच त्यामागे अपेक्षा असल्याचे गोडबोले यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.