मलकापूर पालिकेतर्फे नागरिकांना पाणी बचतीने आवाहन

कराड – मलकापूर शहरामध्ये 247 नळपाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून गेली 10 वर्षे चोवीस तास अखंडित पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु यावर्षी राज्यात पाणी टंचाईची परिस्थिती पाहता सर्व धरणांमधील पाणीसाठा अत्यंत कमी झालेला आहे. कोयना धरणामध्येही अवघा 13 टक्के पाणीसाठा राहिलेला आहे. यामुळे प्रशासनाने वीजनिर्मिती थांबवून शिल्लक पाणीसाठ्याचा उपयोग हा पिण्याच्या पाण्यासाठी करण्याचे ठरविले आहे. नागरिकांनी सामाजिक जाणिवेचे भान ठेवून पाण्याचा वापर करताना विचारपूर्वक 10 टक्के बचत करावी, असे आवाहन उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केले आहे.

शिंदे म्हणाले, सध्या राज्यामध्ये अनेक शहरात भीषण पाणी टंचाई भासत असून मलकापूर शहरातील नागरिक हे पाणी उपलब्धतेच्या बाबतीत निश्‍चित भाग्यवान आहेत. मलकापूर शहराला 24 तास पाणी पुरवठा उपलब्ध आहे. असे असले तरी पाणी वापराबाबत मात्र सामाजिक भान ठेवून सर्वांनी पाणी बचत करावी. याबद्दल उपाय योजना नागरिकांकडून होणे आवश्‍यक आहेत.

गाडी धुण्यासाठी पाईप लावून पाणी वापरू नये, नळाच्या पाण्याचा फ्लो कमी करून ठेवणे, खास करून वॉशबेसिन वापरताना भरपूर पाणी वाया जाते. घरातील व सोसायटीमधील गळणारे सर्व नळ, पाईप्स दुरुस्त करून घेणे, आपल्या प्रभागामध्ये कोठे पाणी वाया जात असेल तर नगरपरिषदेस तत्काळ कळविणे, रोज रात्री बिल्डिंगचे गच्चीतील व्हॉल्व्ह बंद करणे, टाकी वाहून जाणार नाही याची काळजी घेणे, यावर्षी अनेक ठिकाणी पाण्याचे अत्यंत दुर्भिक्ष असून आपण सर्वांनीच पाणी बचतीची सवय लाऊन घेऊया. पाणी म्हणजे जीवन हे आजच्या प्रगत पिढीने समजून घेणे आवश्‍यक वाटते. याचा विचार करून आपल्या दैनंदिन पाणी वापरामध्ये 10 टक्के बचत करण्याचे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.