नवी दिल्ली – गुजरात मध्ये वायु या चक्रीवादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वादळग्रस्तांच्या मदतीसाठी तेथील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहन पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. या वादळापासून गुजरात मधील रहिवाशी सुरक्षीत राहावेत अशी प्रार्थनाही राहुल गांधी यांनी केली आहे. हे वादळ रूद्र रूप धारण करीत असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विटर संदेश जारी केला आहे.
उद्या या वादळाचा फटका गुजराला बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तेथे तुफानी वादळासह जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली असून त्या अनुषंगाने सावधगिरी बाळगण्याचा इशाराही सर्व संबंधीत भागाला हवामान खात्याने दिला आहे.