नवी दिल्ली – “मराठी भाषा गौरव दिन’ या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांच्या जयंती दिनाच्यानिमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राने कुसुमाग्रजांच्या कविता वाचनाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन साहित्य रसिकांना करण्यात येत आहे.
वि.वा शिरवाडकरांचे एकूण 24 कविता संग्रह, 3 कादंबऱ्या, 16 कथा संग्रह, 19 नाटके, 5 नाटिका व एकांकी आणि 4 लेखसंग्रह आदी साहित्य प्रसिध्द आहे. 1964 मधील गोव्याच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1974 मध्ये त्यांच्या नटसम्राट ह्या नाटकाला साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले तर याच कलाकृतीला 1987 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला.
कुसुमाग्रजांच्या 24 कविता संग्रहांमध्ये जीवनलहरी , विशाखा , समिधा , किनारा, मेघदूत अनुवाद, मराठी माती, स्वगत ,जाईचा कुंज बालांसाठी कविता, हिमरेषा, वादळवेल, रसयात्रा, छंदोमयी, मुक्तायन, श्रावण, प्रवासी पक्षी, पाथेय, बालबोध मेव्यातील कुसुमाग्रज, माधवी, महावृक्ष, करार एका ताऱ्याशी, चाफा, मारवा, अक्षरबाग, थांब सहेली या काव्यसंग्रहांचा समावेश आहे.
कुसुमाग्रजांच्या या 24 काव्य संग्रहातील निवडक कविता व्हिडीओ स्वरूपात या कार्यालयास पाठवावे. सुस्पष्टोच्चार व उत्तम सादरीकरण असणा-या कविता वाचनाची कार्यालयाच्या संपादन मंडळाकडून निवड झाल्यावर आमच्या ट्विटर, फेसबुक, युटयूब, इंस्टाग्राम आदीं द्वारे प्रसिध्दी देण्यात येईल.
कविता वाचणाऱ्या व्यक्तीने स्वत:चा अल्प परिचय, कवितेचे शिर्षक व कविता संग्रहाचे नाव याची थोडक्यात माहिती दयावी. कार्यालयाच्यावतीने दिनांक 14 ते 27 फेब्रुवारी 2021 या कालावधीत कुसुमाग्रजांच्या कविता वाचनाचे व्हिडीओ प्रसारीत करण्यात येणार आहेत. 98991141130 आणि 9871742767 या व्हाट्सअप क्रमांकांवर रचना पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.