मुंबई : 31 मे जागतिक तंबाखुविरोधी दिन. जागतिक तंबाखुविरोधी दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून दूर राहण्याचा ठाम निर्धार करुया. तसेच आपले कुटुंबिय, नातेवाईक, मित्र, परिसरातील नागरिकांनी सुद्धा तंबाखूच्या सेवनापासून दूर रहाण्यासाठी जनजागृती करण्याचा संकल्पही यानिमित्तानं सर्वांनी करुया. तंबाखूपासून दूर राहूया, आरोग्यदायी जीवन जगूया असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केले आहे.
दरवर्षी ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त जागतिक आरोग्य संघटनेमार्फत घोषवाक्यही दिले जाते. ‘तरुणांना तंबाखू उद्योगांच्या तावडीतून वाचवा आणि त्यांना तंबाखू व निकोटीनच्या वापरापासून दूर ठेवा’ असे घोषवाक्य या वर्षासाठी देण्यात आले आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या दोन दिवस आधी राज्य शासनाने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान प्रतिबंध आणि थुंकण्यास बंदी आदेश लागू केले आहेत.