बिचुकलेचा जामीनासाठी न्यायालयात अर्ज

सातारा – गेल्या आठवड्यापासून अटकेत असलेल्या “बिग बॉस’ फेम अभिजित बिचुकले यांच्या वतीने गुरूवारी न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला. मात्र, खंडणी प्रकरणी अपेक्षित असलेली सुनावणी न झाल्याने आता बिचुकले यांच्या जामीन अर्जावरील निर्णयावरच त्यांच्या “बिग बॉस’च्या प्रवेशाचे भवितव्य अवलंबून आहे.

धनादेश न वटल्याच्या प्रकरणात बिचुकले यांना सातारा पोलिसांनी अटक केल्यानंतर त्या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला होता. मात्र, खंडणीप्रकरणात बिचुकले यांची कारागृहात रवानगी करण्यात आली तेव्हापासून बिचुकले कळंबा कारागृहात आहेत. बुधवारी बिचुकले यांच्यावरील आरोप निश्‍चिती झाली. यावेळी न्यायालयाने बिचुकले यांना त्यांच्यावरील आरोपांची माहिती दिल्यानंतर त्यांनी कळंबा कारागृहातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आरोप मान्य नसल्याचे सांगितले होते.

बिचुकले यांनी आरोप नाकारल्यानंतर त्या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी आरोप निश्‍चितीच्या जबाबावर बिचुकलेंची सही असणे गरजेचे असल्याने त्यावर सही घेण्यासाठी बिचुकेलेंचे वकील कोल्हापूरला गेले होते. मात्र, सुनावणीसाठी लागणारा कालावधी जास्त असल्याने बिचुकले यांच्या वकीलांनी गुरूवारी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. त्यावर सरकारी वकील आज (शुक्रवारी) त्यांची बाजू मांडणार असून त्यानंतर बिचुकलेचे वकील ऍड. शिवराज धनावडे युक्तीवाद करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.