“आप्पा, तुमचाच वारसा चालवतोय….”

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचे भावनिक ट्‌विट

मुंबई : भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती असून त्यानिमित्त बीडमधील गोपीनाथ गडावर समर्थकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. स्वाभिमान दिवस असं या कार्यक्रमाला नाव देण्यात आले असून यावेळी पंकजा मुंडे यांच्यासहित भाजपा, शिवसेनामधील अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. दुपारी होणाऱ्या या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदार धनंजय मुंडे यांनी ट्‌विटच्या माध्यमातून आठवणी जागवत विनम्र अभिवादन केले आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्‌विट करत म्हटलं आहे की, आप्पा, तुमचाच वारसा चालवतो आहे. संघर्षाचा जनसामान्यांच्या कल्याणाचा सदैव आपल्या आठवणीत! जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन


धनंजय मुंडे यांनी याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे औरंगाबादमधील गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे काम जलद गतीने पूर्ण करण्याची घोषणा करावी अशी मागणी केली. ट्‌विटच्या माध्यमातूनच त्यांनी ही माहिती दिली होती. त्यांनी लिहिलं होतं की, सबंध आयुष्य शेतकरी, कष्टकरी, वंचित घटकांसाठी परिश्रम करणाऱ्या लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांची उद्या जयंती आहे. यानिमित्ताने औरंगाबाद येथील स्व. मुंडे साहेब यांच्या स्मारकाचे काम जलद गतीने पूर्ण करण्याची घोषणा करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

दरम्यान आज राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने परळीत 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत स्वाभिमान सप्ताह साजरा आहे. धनंजय मुंडे यांनी यासंबंधी माहिती देताना सांगितलं होतं की, पद्मविभूषण खासदार शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत स्वाभिमान सप्ताह साजरा केला जात आहे. पवार साहेब यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यात गझलनवाज भिमराव पांचाळे यांच्या बहारदार गझलांचा कार्यक्रम तसेच संगीत क्षेत्रातील कलाकारांचा गौरव करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.