पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या तक्रारनिवारणासाठी अॅप विकसित

विद्यापीठाकडून आजपासून विशेष सुविधा कार्यान्वित

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांच्या तक्रारी घेण्यासाठी आणि त्यांच्या निवारणासाठी ऑनलाईन अॅप सुरू करण्यात आले असून, आता ते आजपासून कार्यान्वित करण्यात आले आहे.

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याहस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. महेश आबाळे आदी. उपस्थित होते. ही सुविधा विद्यापीठाच्या आवारातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या अॅपद्वारे विद्यार्थी विद्यापीठ आवारातील नेटवर्कसंबंधी (वाय-फाय, इंटरनेट, ई-मेल) तसेच, वसतिगृहाशी संबंधित तक्रारी (प्लंबिंग, वीज, हाऊस किपिंग) करू शकणार आहेत. त्यासाठी ते विद्यापीठाने दिलेल्या लॉगिन-आय.डी.चा उपयोग करू शकतील. प्रत्येक तक्रारीला क्रमांक दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, त्यांनी नोंदवलेल्या तक्रारींवर काय कार्यवाही झाली याचा ट्रॅकही ठेवू शकणार आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली.

पुढच्या टप्यात विद्यार्थ्यांप्रमाणेच विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनाही ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. अॅपमुळे तक्रारनिवारणाच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व (Transparency & Accountability) येण्यास मदत होणार आहे. ही सुविधा विद्यार्थी वापरू लागल्यानंतर त्यात अधिकाधिक सुधारणा करणे शक्य होणार आहे, असेही डॉ. पवार यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.