मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून आता देशभरात राजकारण ढवळून निघत आहे. मराठीच्या मुद्द्यांवर उत्तर भारतीयांवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या नव्या राजकारणाला आव्हान देताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला जोरदार विरोध केला आहे. त्यातच आता आणखी एक भर पडली आहे. ती म्हणजे उत्तर प्रदेशमधील नंदिनीनगर येथे आयोजित सभेत महंतांनी राज ठाकरे यांना एका आठवड्यात माफी मागा, अन्यथा ‘छटी का दुध याद दिलाएंगे’ असा थेट इशारा दिलाय.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना महंतांनी हा इशारा दिला आहे. सभेत उपस्थित महंत म्हणाले, “माझ्या हातात धर्मदंड आहे. आम्ही राज ठाकरे यांना हे सांगायला आलो आहोत की त्यांनी याआधी उत्तर भारतीयांचा जो अपमान केलाय त्यासाठी त्यांनी माफी मागावी. राज ठाकरे यांनी माफी मागितली, तर त्यांचं स्वागत होईल. त्यांनी माफी मागितली नाही, तर त्यांना ‘छटी का दुध याद दिलाएंगे’. उत्तर भारतीयांचा अपमान करणारा कोणीही ‘माई का लाल’ जन्माला आलेला नाही.”
“राज ठाकरे यांनी माफी मागितली नाही, तर त्याचं वेगळ्या पद्धतीने स्वागत केलं जाईल. आमची त्यासाठी संपूर्ण तयारी आहे. उत्तर भारतीयांचा जनसुमदाय राज ठाकरे ज्या दिवशी उत्तर प्रदेशमध्ये येतील त्या दिवसाची वाट पाहत आहे. माझ्या हातातील धर्मदंड देशद्रोहींना सुधारेल आणि देशप्रेमींचं संरक्षण करेल. त्यासाठीच आमच्याकडे धर्मदंड असतो,” असेही या महंतांनी सांगितले.
विशेष म्हणजे हे महंत याआधी आग्रा येथील प्रसिद्ध ताजमहालमध्ये घुसले होते. हा ताजमहाल नसून तेजोमहल आहे असा त्यांचा दावा आहे. यावर बोलताना ते म्हणाले, “आग्रा येथील ताजमहाल आमचा तेजोमहल आहे. ते प्राचीन शिवमंदीर आहे. त्या प्रकरणात रीट पिटीशन दाखल करण्यात आली आहे. लवकरच तेथे पुजा सुरू करण्यात येईल. मुघल आक्रमकांनी ४० हजार मंदिरं तोडली होती ती सर्व पुढील ३-४ वर्षात रिकामी करण्यात येतील.”