पायाभूत सुविधा वाढविण्याबरोबरच रोजगार निर्मितीला प्राधान्य देणार – नितीन गडकरी

नवी दिल्ली – आगामी काळात पायाभूत सुविधा वाढविण्याबरोबरच रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि लघुउद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. गडकरी हे धडाडीचे मंत्री समजले जातात. या अगोदरच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी वाहतूक, जलवाहतूक, बंदर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केली होती.

ते म्हणाले की, आपण पायाभूत सुविधा जागतिक पातळीच्या करण्यावर भर देणार आहोत. त्यामुळे विकासदर त्याचबरोबर रोजगारनिर्मिती होईल. गेल्या वेळी पदभार स्वीकारण्याअगोदर 2.60 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प रखडले होते. मात्र त्यांनी ते पूर्णत्वास नेले त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात नवीन प्रकल्प सुरू केले होते. मुंबई-पुणे एक्‍सप्रेसवे निर्मितीमध्ये त्यांनी सिंहाचा वाटा उचलला होता.

दरम्यान, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता या विभागाचा कार्यभार मंगळवारी महेंद्र पांडे यांनी स्वीकारला. आगामी काळात कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती वाढवण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात या विभागाने 100 दिवसाचा कृती कार्यक्रम तयार केलेला आहे. या कार्यक्रमाला लवकरच अंतिम स्वरूप देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.