Pankaja Munde-Dhananjay Munde । राज्यात आज विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर भगवान गडावर भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडत आहे. त्यातच कृषिमंत्री धनंजय मुंडे हे तब्बल 12 वर्षांनंतर भगवानगडावरील दसरा मेळाव्यात एकत्र आले आहेत.
राज्यात दसरा मेळाव्याची मोठी परंपरा आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या भगवान गडावरील मेळाव्याकडे राज्यभराचे लक्ष वेधले जात होते. त्यांच्यानंतर पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा सुरू केला.
धनंजय मुंडे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात भूमिका घेतल्यानंतर मुंडे घराण्यात फुट पडली होती. मात्र, राज्यातील बदलत्या समिकरणात भाजपा आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी सत्तेत सोबत आली आहे. लोकसभेसाठी निवडणुकीच्या दरम्यान पंकजा मुंडे आणि त्यांचे भाऊ धनंजय मुंडे हे अनेक वर्षांनी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.
भगवान भक्ती गडावर आज पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होत आहे. या दसरा मेळाव्यात मंत्री धनंजय मुंडे यांनी धडाकेबाज भाषण केलं. या भाषणत धनंजय मुंडे यांनी विविध मुद्द्यांना स्पर्ष केलं. तसेच मनोज जरांगे यांना देखील त्यांनी चांगलंच धारेवर धरलं आहे.
यावेळी बोलताना धनंजय मुंढे म्हणाले, “काही जणांनी मला विचारलं, म्हटलं मला आनंद आहे. ज्याला दसरा माहिती त्याला प्रभू श्रीराम पण माहिती पाहिजे. पुढचं मी बोलणार नाही तुम्ही समजून घ्या.
अनेक वेळा संकटाच्या काळात गोपीनाथ मुंडे साहेबांपासून पंकजा मुंडेपर्यंत तुम्ही माझ्या बहिणीच्या पाठीमागे उभे राहिलात. अनेक संघर्षात तुम्ही मेळावा केला, सोबत कोण आहे बघितलं नाही.
भाऊ आहे की नाही हे पाहिलं नाही. जरी 12 वर्ष आपलं पटलं नाही. तरी मी वेगळा मेळावा करण्याचा विचार मनात ही आणला नाही. ज्याला जो वारसा दिलाय त्याने तो चालवायला पाहिजे.
मला, पंकजाला जेवढा आनंद आहे त्या पेक्षा जास्त आनंद तुमच्या डोळ्यात दिसतोय. नवीन मेळावा सुरु करून कोणीही या मेळाव्याची पवित्रता संपवू शकत नाही, अशी टीका धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाव न घेता केली आहे.
ते पुढे म्हणाले, “आता दसरा मेळाव्याची परंपरा फक्त बीड जिल्ह्यात नाही. संघाचा दसरा मेळावा जगात प्रसिद्ध आहे. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचा दसरा मेळावा आहे. एकनाथ शिंदे यांचा मेळावा आहे.
बीड जिल्ह्यात संत भगवान बाबानंतर गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेला आणि पंकजा मुंडेंनी सुरू केलेला हा मेळावा आहे. लोकशाही आहे. मला काही लोकांनी प्रश्न विचारले. मी म्हटलं आनंद आहे. दसरा का असावा.
हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. दसरा ज्याला माहीत आहे, त्याला प्रभू रामचंद्रही माहीत असावेत. प्रभू रामचंद्राशिवाय दसऱ्याचं महत्त्व नाही. त्यामुळे मी पुढचं काही बोलणार नाही. तुम्ही समजून घ्या…, असं धनंजय मुंडे म्हणाले.