श्रेय कोणीही घ्या, पण कोपरगावला पाणी द्या!

कोपरगाव – सध्या कोपरगाव शहरात पाण्याची समस्या अतिशय गंभीर झाली आहे. साठवण तलावातील खालवलेल्या पाणीसाठ्यामुळे गाळ मिश्रित व अशुध्द पाणीपुरवठा शहराला होत आहे. महिन्यातून केवळ दोनवेळा पाणीपुरवठा होत असल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. पालिकेच्या साठवण तलावात पाणी नसल्याने गोदावरी डाव्या कालव्याला पिण्याच्या पाण्याचे आवर्तन कधी सुुटेल याच प्रतीक्षेत कोपरगावकर आहेत. अशातच माझ्यामुळेच पिण्याच्या पाण्याचे आवर्तन कालव्याला सोडण्यात येत आहे, असा दावा आमदार स्नेहलता कोल्हे व नगराध्यक्ष विजय वहाडणे या दोघांनी केला आहे. त्यामुळे श्रेय कोणीही घ्या पण, कोपरगावला पाणी द्या, असे म्हणण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे.

कोपरगावकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणावर गंभीर झाला असून सध्या नागरिकांचे हाल होत आहे. तेव्हा गोदावरी कालव्यांना पिण्याच्या पाण्याचे आवर्तन हे लवकरात लवकर सोडावे अशी मागणी वहाडणे यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. त्यानुसार आता कालव्यांना पाण्याचे आवर्तन पंधरा दिवस अगोदर सोडण्याचे नियोजन पूर्ण झाले असून 1 मे रोजीच कालव्यांना आवर्तन सुरू होईल, अशी माहिती आ. कोल्हे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

आ. कोल्हे यांनी पत्रकात म्हटले आहे की, चालुवर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नाही. दुष्काळाची तीव्रता यंदा जानेवारीपासूनच जाणवायला सुरुवात झाली. त्यातच कोपरगाव शहराची लोकसंख्या एक लाखाच्यावर असून उन्हाळ्याची तीव्रताही वाढत आहे. त्यामुळे सध्या शहरात पाणीबाणी निर्माण झाली होती तसेच गोदावरी डाव्या आणि उजव्या कालव्यावरील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाणी योजनांचे साठवण तलावही कोरडे पडले आहेत. तेथेही पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे.

याबाबत उत्तर महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे आदींबरोबर वेळोवेळी संपर्क करून कोपरगावकरांचे सध्या पिण्याच्या पाण्याचे हाल कमी होत नाहीत. तेव्हा पाटबंधारे खात्याच्या ठरलेल्या नियोजनाआधी कोपरगावाला प्यायला लवकरात लवकर पाणी मिळावे, यासाठी पंधरा दिवस आधीच त्याचे नियोजन करावे म्हणून मागणी करण्यात आली आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडेही याचा पाठपुरावा केला. त्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेत संबंधित विभागास गोदावरी कालव्यांना पंधरा दिवस आधीच पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याबाबत आदेश केले आहे. त्यामुळे कोपरगावकरांची पाणी टंचाईची तीव्रता काही प्रमाणात कमी होईल असेही आ. कोल्हे म्हणाल्या.दरम्यान, पाणीटंचाईमुळे कोपरगाव शहराला 12 दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागतो.

नागरिकांना पाण्याची तीव्र टंचाई भासते. म्हणून गोदावरी डाव्या कालव्याचे आवर्तन त्वरित सोडावे, यासाठी कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे, नरेंद्र मोदी विचार मंचचे विनायक गायकवाड, सुभाष दवंगे यांनी दि.23 एप्रिल रोजी जळगाव येथे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची समक्ष भेट घेऊन चर्चा केली. ना.महाजन यांनी त्वरित संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. एका आवर्तनासाठी 2:50 टीएमसी पाणी लागते. पण धरणात फक्त 2:02 टीएमसी पाणी शिल्लक आहे. तरीही आम्ही आग्रह धरल्यामुळे ना.महाजन यांनी अधिकाऱ्यांना 1 मे रोजी पाणी आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले. त्याआधी पाणी आवर्तन देणे अवघड असले तरीही मी प्रयत्न करतो असेही त्यांनी सांगितले. कोपरगाव शहरातील अनेक सामाजिक, स्वयंसेवी, धार्मिक, व्यावसायिक संघटनांनी दिलेल्या बहिष्काराच्या इशाऱ्याचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिले. बातम्यांची कात्रणेही ना. महाजन यांनी पाहिली व कोपरगाव शहरातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन 15 मे रोजी आवर्तन न सोडता आवर्तन 1 मे रोजीच सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकशाहीमध्ये प्रत्येकास सर्वप्रकारचे स्वातंत्र्य आहे. मतदानावर बहिष्कार टाकून आपण 5 वर्षानंतर येणारी मतदानाची संधी घालवू, नये असे वाटते. आपल्या सर्वांच्या बहिष्काराच्या इशाऱ्याचा परिणाम म्हणूनच पाणी आवर्तन लवकर मिळावे, यासाठीच्या प्रयत्नाला थोडे तरी यश मिळाले असे वाटते. ज्यांना बहिष्कार टाकायचाच आहे. त्यांनी टाकावा. या देशाचा कारभार कुणाच्या हाती सोपवायचा याचा निर्णय 29 तारखेच्या मतदानाद्वारे करता येणार आहे. मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडावे, हिच एक नम्र अपेक्षा व विनंती आहे. कुणावरही माझे म्हणणे लादण्याचा माझा हेतू नाही, असे नगराध्यक्ष वहाडणे म्हणाले. वरिष्ठ पातळीवर नगराध्यक्ष वहाडणे यांच्या शब्दाला एवढे वजन आहे, तर मग पालिकेच्या प्रत्येक प्रश्‍नांमध्ये कुठेच आडकाठी येण्याचे काहीच कारण नाही. असेच यावरून दिसून येते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.