चिंता वाढली! करोना ‘डेल्टा प्लस’चे महाराष्ट्रात आढळले 7 बाधित

मुंबई – राज्यात तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरू शकण्याची भीती व्यक्त होत असलेल्या सार्स- कोव्ह डेल्टा प्लस विषाणूचे सात संसर्गित राज्यात आढळले आहेत. त्यातील पाच रुग्ण एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात असून याचा प्रसार तपासण्यासाठी राज्यभरातीन नमुने पाठवण्यात आले आहेत. याशिवाय रत्नागिरी, नवी मुंबईमध्येही प्रत्येकी एक बाधित आढळळा आहे.

भारतात प्रथम आढळून आलेल्या डेल्टा म्हणजेच बी.1.617.2 या करोना विषाणू उत्परिवर्तनात आणखी उत्परिवर्तन घडून डेल्टा प्लस हा नवा विषाणूचा प्रकार तयार झाला आहे. नवी मुंबई, पालघर आणि रत्नागिरीमध्ये डेल्टा-प्लस सापडला. आणखी नमुने तपासणीसाठी पाठविले, पण त्याचा अंतिम अहवाल यायचा आहे, असे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.

कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीसह पश्चिम महाराष्ट्रात, विशेषत: कोल्हापूर, सातारा आणि सांगलीमध्ये कोविड -19 रुग्णांमध्ये अपेक्षित घट होताना दिसत नाही. 10 जून रोजी रत्नागिरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 13.7 टक्के होता. त्यावेळा राज्याचा दर हा 5.8 होता. रत्नागिरीमध्ये करोनाचे 6,553 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या जिल्ह्यांमध्ये येतो.

रत्नागिरी जिल्ह्यात पाच जणांमध्ये डेल्टा प्लस विषाणू आढळल्याने ही गावे बंद करण्यात आली आहेत आणि प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले. या पाचपैकी दोघे लक्षण विरहीत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संघमित्र गावडे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.