अनुष्काची भावूक कथा

करोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जसजशी वाढत चालली आहे तसतसे चिंतेचे सावटही वाढत चालले आहे. त्याचबरोबर दुसरीकडे लॉकडाऊनच्या काळात होणाऱ्या स्थलांतरामुळेही प्रश्‍न निर्माण होत आहेत.

उदरनिर्वाहासाठीची व्यवस्था नसल्यामुळे अनेक कामगार शहरांकडून गावांकडे धाव घेत आहेत. यामध्ये अनेक जण पायपीट करून जात आहेत. अनंत अडचणींचा सामना करत गावी पायी जाणाऱ्या लोकांचे लोंढे पाहून बॉलीवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा हेलावून गेली आहे.

तिने तिच्या इंस्टाग्राम अकौंटच्या स्टोरीवर स्थलांतर करणाऱ्या लोकांशी निगडित बातम्या शेअर केल्या आहेत.तसेच त्यांच्याविषयी वाटणारे दुःखही व्यक्‍त केले आहे. त्याचबरोबर या लोकांची मदत करणाऱ्यांची प्रशंसाही केली आहे. 

यामध्ये अनुष्काने एक गर्भवती महिला आणि तिच्या नवऱ्याची बातमी शेअर केली आहे. त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे घरमालकाने त्यांना घरातून बाहेर काढले होते. यानंतर या दोघांनी तब्बल 100 किलोमीरचा प्रवास काहीही न खाता-पिता केला. आपल्या या पोस्टला अनुष्काने अत्यंत भावूक कॅप्शन दिले आहे.

“अशा गोष्टी वाचून जीव तुटतो, हृदय पिळवटून जाते. अशी कृती करणाऱ्या मालकाला जराही लाज कशी वाटली नाही’ असे अनुष्का लिहिते. याखेरीज अनुष्काने आणखी एक बातमी शेअर केली आहे.

यामध्ये हैदराबादमधील एका कंत्राटदाराने स्थलांतरितांसाठी तात्पुरत्या घरांची निर्मिती केली आहे. सोशल मीडियावर अनुष्काने शेअर केलेल्या या दोन्हीही बातम्यांची चांगलीच चर्चा सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.