अनुराधा नागवडेंना उमेदवारीची चौथ्यांदा हुलकावणी!

एकदा लोकसभेला तर विधानसभेला तीनदा अंतिमक्षणी रिंगणाबाहेर

समीरण बा. नागवडे/श्रीगोंदा: जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांना राजकीय वारसा, जनाधार आणि संघटन देखील आहे. परंतु विधानसभा आणि लोकसभेच्या मोठ्या निवडणुकांत त्यांना सलग चारवेळा उमेदवारीने ऐनवेळी हुलकावणी दिल्याने त्यांना मोठ्या निवडणुकीत आपले नशीब आजमवण्याची संधी एकदाही मिळाली नाही.
तालुक्‍यातील वांगदारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदापासून राजकीय श्रीगणेशा केलेल्या अनुराधा नागवडे यांचे नाव पहिल्यांदा 2009 च्या विधानसभा निवडणुकीत स्पर्धेत आले. अनुराधा नागवडे याच उमेदवार असतील असे चित्र असताना ऐनवेळी भाजपतर्फे राजेंद्र नागवडे मैदानात उतरले. 2009 साली विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा नशिबाने त्यांना हुलकावणी दिली. त्यानंतर 2012 साली पंचायत समिती निवडणुकीत हंगेवाडी गणातून नागवडे पंचायत समितीवर निवडून गेल्या. त्यामुळे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अनुराधा या नागवडे कुटुंबातील उमेदवार असणार हे जवळपास स्पष्ट झाले होते. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी राजकीय उलथापालथ झाली आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते हे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये दाखल झाले.

पाचपुतेंच्या पराभवासाठी राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी तालुक्‍यातील पाचपुते विरोधकांची मोट बांधून त्यांच्या पराभवासाठी व्युहरचना आखली. यामध्ये माजी आमदार स्व. शिवाजीराव नागवडे यांनी खा. पवार यांना पाचपुतेंच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याचा शब्द दिल्याने राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटूनही तालुक्‍यात मात्र नागवडेंनी राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. परिणामी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत विधानसभा निवडणूक लढविण्याची तीव्र इच्छा असताना देखील नागवडे यांनी आपला निर्णय मागे घेतला. यावेळी उमेदवारीने त्यांना दुसऱ्यांदा हुलकावणी दिली.

2017 साली नागवडे बेलवंडी गटातून विक्रमी मताधिक्‍याने जिल्हा परिषदेवर निवडून गेल्या. त्यांना महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदाची संधी मिळाली. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अचानक राष्ट्रवादीकडून नागवडे यांचे नाव चर्चेत आले, त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेशाची तयारी केली, अन्‌ पुन्हा एकदा त्यांना उमेदवारीने ऐनवेळी हुलकावणी दिली. तीच परिस्थिती आताच्या विधानसभा निवडणुकीत पहायला मिळाली. नागवडे यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न अपुरे ठरले. त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु खा. सुजय विखे यांनी नागवडेंची मनधरणी केली. त्यानंतर नागवडेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतला अन नागवडे सलग चौथ्यांदा विधानसभा अथवा लोकसभेच्या रिंगणातून अंतिमक्षणी बाहेरच राहिल्या. 2009 ते 2019 या दहा वर्षांच्या काळात नागवडे यांना विधानसभेला तीनवेळा आणि लोकसभेला एकदा अशी सलग चारवेळा उमेदवारीने हुलकावणी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)