ब्रुसेल्स –लिओ रफेलोव्ह याने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर अॅण्टवर्प संघाने ब्रुगी संघाचा 1-0 असा पराभव केला. या विजयाच्या जोरावर ऍण्टवर्पने बेल्जियन करंडक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
मार्च महिन्यापासून करोनाचा धोका वाढल्यानंतर जगभरातील सर्व स्पर्धा एकतर स्थगित करण्यात आल्या होत्या किंवा रद्द केल्या गेल्या होत्या. जून महिन्यात करोनाचा धोका कमी झाल्यानंतर ही स्पर्धा पुन्हा सुरू करण्यात आली. त्यात साखळीतील सामन्यांत सातत्याने विजय मिळवत संपूर्ण स्पर्धेवर अॅण्टवर्प संघाने वर्चस्व राखले. करोनाचा धोका जगभरात कायम असताना या स्पर्धेला प्रेक्षकांशिवाय खेळविण्यात आले.अॅण्टवर्पने अप्रतिम बचावाचे प्रात्यक्षिक सादर करत या स्पर्धेचे तिसरे विजेतेपद मिळवले. ही स्पर्धा करोनाचा धोका पसरण्यापूर्वीच सुरू करण्यात आली होती. मात्र, साखळतील काही सामने बाकी असताना करोनामुळे स्थगित केली गेली.
गेल्या महिन्यात पुन्हा सुरू झालेल्या या स्पर्धेत अॅण्टवर्पने सातत्यपूर्ण कामगिरी करत अंतिम फेरी गाठली. अंतिम लढतीत पहिल्या हाफमध्येच लिओ रफेलोव्हने 25 व्या मिनिटाला सुरेख गोल केला व संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अप्रतिम बचावाचे सादरीकरण करताना ब्रुगी संघाला एकही संधी दिली नाही व विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.