पुणे – लष्करी परिसरात करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने लष्कर परिसरात डोअर टू डोअर टेस्ट सुरू केली आहे. या उपक्रमांतर्गत गेल्या तीन दिवसांत तब्बल तीन हजार नागरिकांची चाचणी घेण्यात आली असून, त्यापैकी केवळ 37 नागरिकच संशयित रुग्ण म्हणून आढळून आले आहेत, अशी माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे देण्यात आली आहे.
करोनाचा संसर्ग होऊ नये. जर एखाद्यामध्ये काही लक्षणं आढळून आली तर त्याच्यावर तत्काळ उपाय व्हावेत. याकरिता बोर्डातर्फे घरोघरी जाऊन चाचण्या घेण्यात येत आहेत.
बोर्डाच्या सरदार पटेल रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड म्हणाले की, बोर्डाने सुरू केलेल्या डोअर टू डोअर टेस्टिंगला नागरिकांचाही प्रतिसाद चांगला मिळत आहे. या चाचणीत 37 संशयित रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांची सखोल तपासणी करण्यात आली. त्यापैकी केवळ 11 नागरिकांमध्येच कोरोनाची लक्षणे आढळून आली आहे. या 11 पैकी 8 जणांना रुग्णालयात दाखल करून घेतले असून, तीन जण होम क्वारंटाइन आहेत.
बोर्डातर्फे पुढील पंधरा दिवस आणखीन वेगाने घरोघरी जाऊन नागरिकांची ऍन्टिजेन टेस्ट घेण्यात येईल. रुग्णालयातर्फे डॉक्टर, नर्स आणि स्टाफ अशा एकूण आठ टीम या कामासाठी कार्यरत करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी यासाठी बोर्ड प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन डॉ.विद्याधर गायकवाड यांनी केले.