नवी दिल्ली : इटलीतील वैज्ञानिकांनी करोनानंतर शरीरात तयार होणाऱ्या अँटिबॉडीजबाबत मोठी माहिती दिली आहे. वैज्ञानिकांच्या मते, करोनातून बरे झाल्यानंतर जवळपास 8 महिने रुग्णाच्या रक्तात करोनाविरोधी अँटिबॉडीज राहतात.
अँटिबॉडीज शरीरात असेपर्यंत करोना विषाणूचा धोका कमी होतो. मिलानच्या सैन राफेल रुग्णालयातील डॉक्टरांच्या मते, करोना रुग्णांमध्ये ज्या अँटिबॉडीज बनतात, त्या रुग्णाचे वय, अन्य व्याधींची बाधा झाल्यानंतरही रक्तात कायम राहतात. त्यामुळे अशा परिस्थितीत रुग्णाला कोणत्याही विषाणूमुळे आजारी पडण्याचा धोका खूप कमी होतो.
इटलीतील संशोधकांनी अभ्यासासाठी, करोनाची लक्षणे असलेल्या 162 रुग्णांची निवड केली होती, ज्यांना मागील वर्षीच्या करोना लाटेत संसर्ग झाला होता. त्यांचे रक्ताचे नमुने आधी मार्च आणि एप्रिलमध्ये घेण्यात आले होते. त्यानंतर जे करोनातून बरे झाले, त्यांचे रुक्ताचे नमुने नोव्हेंबरमध्ये पुन्हा घेण्यात आले. त्यामध्ये असे निदर्शनास आलं की, त्या रुग्णांच्या शरीरात आठ महिन्यांपर्यंत रोगाशी लढणाऱ्या अँटिबॉडीज तयार झाल्या होत्या.
संशोधकांचा हा अहवाल नेचर कम्युनिकेशन्स सायंटिफिक जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. या संशोधनात करोनामधून बरे होणाऱ्या रुग्णांच्या अँटिबॉडीजवर भर देण्यात आला होता.