केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांचा अनाकलनीय दावा
जाहिरातीमधील पापडाचे नाव आहे भाभीजी पापड
बिकानेर – केंद्रीय सांसदीय कामकाजमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी एक पापड ब्रॅंड जारी केला आहे. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्या या पापडामुळे करोनाशी लढा देण्यासाठी खाणाऱ्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात, असा अनाकलनीय दावा मंत्री मेघवाल यांनी केला आहे.
सध्या राजस्थानमधील सोशल मीडियावरील मेघवाल यांच्या या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओमध्ये मेघवाल म्हणतात की, यामध्ये असे घटक समाविष्ट करण्यात आले आहेत की, त्यामुळे शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. भाभीजी पापड असे या पापडाचे नाव आहे.
भारताबरोबरच जगात करोना व्हायरसने हाहाकारा उडविला आहे. जागतिक पातळीवर दीड कोटी लोकांना याचा संसर्ग झाला असून भारतातील संसर्गाची संख्या बारा लाखांवर आहे. केंद्र सरकार या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व ताकद एकवटून प्रयत्न करीत असतानाच मेघवाल यांनी या पापडाचे समर्थन केले आहे.
याअगोदर बाबा रामदेव यांच्या पतंजली या उद्योग समूहाने करोनावर खात्रीचे आयुर्वेदिक औषध केले असल्याचा दावा केला होता. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या दाव्याला हरकत घेऊन कंपनीकडून स्पष्टीकरण मागितले होते. त्यानंतर पतंजली उद्योग समूहाने हा दावा परत घेतला आणि औषधामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि करोनाचा संसर्ग न होण्यास मदत होते असे म्हटले आहे.